मुलाने केली वडीलांची हत्या, अमानुष हत्येने खळबळ

हत्येनंतर मेंदू काढून दिला कुत्र्याला खायला

0

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील आजची सकाळ ही हादरून सोडणारी ठरली. जन्मदात्या आंधळ्या वडीलांची मुलाने अमानुषरित्या हत्या केल्याची घटना आज गुरुवारी पहाटे उघडकीस आली. ही घटना इतकी अमानुष होती की आरोपीने मृतकाचा मेंदू बाहेर काढून कुत्र्याला खायला दिल्याची माहिती मिळत आहे. तसेच हत्येनंतर आरोपीने काठीने मारहाण करून शरीर छिन्नविछिन्न केले. हा प्रकार शेतीतील वादातून झाला असल्याचे समोर आले आहे.

झरी तालुक्यातील लिंगटी ग्रामपंचायत अंतर्गत खापरी हे गाव येते. या गावात आदिवासी समाजाचे लोक राहतात. गावातच दत्तू उरवते नामक ६५ वर्षीय आंधळा वृद्ध कुटुंबासह राहायचा. तो शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्यांना पंजाबराव व नामदेव अशी दोन मुलं आहेत. आरोपी नामदेव व त्याचा भाऊ पंजाबराव यांच्यात शेतीच्या वाटणीवरून वाद होता. या वादावरून आरोपीचे त्याच्या वडीलांसोबत पटत नव्हते.

आरोपी लग्न झाल्यानंतर तो सासऱ्याकडे राहत होता. मात्र एक महिन्यांपूर्वी तो आपल्या कुटुंबासह खापरीमध्ये राहण्यास आला. पंधरा दिवस राहिल्यानंतर त्यांने त्याच्या पत्नीला सासरी सोडले व तो खापरी येथे परतला. 24 जुलै रोजी नेहमी प्रमाणे आई वडील त्यांच्या खोलीत झोपण्याकरिता गेले. तर आरोपी नामदेवचा भाऊ पंजाबराव हा शेतात जागली करिता गेला. रात्री ३ वाजता दरम्यान आरोपी नामदेव हा आई वडील झोपलेल्या खोलीत जाऊन त्याने काठीने त्याच्या आंधळ्या वडील दत्तू उरवते यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्यात दत्तू जागेवरच ठार झाले.

आरोपी नामदेव व मृतक दत्तू उरवते

आवाजाने बाजूला झोपलेली नामदेवची आई जागी झाली. त्याने आईला घराबाहेर जाण्यास सांगितले. घाबरलेल्या आईने सुनेला शेतात गेलेल्या मुलाला बोलाऊन आणण्यास पाठविले. पंजाबराव लगेच शेतातून गावात आला व त्याने घराशेजारील काही लोकांना गोळा करून खोलीत प्रवेश केला. तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

जेव्हा ते घरात पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मृतदेहावर ठिकठिकाणी काठीने प्रहार करून जखमा करण्यात आल्या होत्या. दत्तू यांची कवटी फोडलेली होती. त्यात मेंदू नव्हता. आरोपी नामदेवने कवटीतून मेंदू काढून तो कुत्र्याला खायला दिला. मात्र कुत्र्याने न खाल्याने त्याने शेनखत असलेल्या गड्ड्यात गाडला असल्याची चर्चा गावक-यांमध्ये आहे.

गावातील लोकांनी ठाणेदार अमोल बारापात्रे यांना लगेच माहिती दिली. पहाटे ४ वाजता पोलीस घटनास्थळी पोहचले. झालेला प्रकार पाहून पोलीस हादरून गेले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नाईक हे सुद्धा घटनास्थळी सकाळी ६.३० पोहचले. आरोपीला अटक करण्यात आली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करिता पाठविण्यात आला. भाऊ पंजाबराव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नाईक व अमोल बारापात्रे करीत आहे.

उरवते कुटुंबात १२ एकर शेती असून कुटुंबात शेतीचा वाद सुरू होता. या शेतीच्या वादातून हत्याची केल्याची कबुली आरोपीनी पोलिसांना दिली. या प्रकारामुळे संपूर्ण झरी तालुका हादरून गेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.