इंग्लिश-विंग्लिशमध्ये का मिळालेत इतक्या विद्यार्थ्यांना ‘झिरो’
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पेपर तपासणीचा घोळ झाल्याचा आरोप
विवेक तोटेवार, वणी: येथील लोकमान्य टिळक महाविद्याल हे संत गाडगे बाबा विद्यापीठाच्या अंतर्गत येते. येथील वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षाचा निकाल 25 जुलै रोजी लागला. यात 53 विद्यार्थी नापास झालेत. त्यातच 30 विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात शून्य गुण मिळाल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना निवेदन देऊन पेपरची फेरतपासणी करण्याबाबत निवेदन दिले आहे.
सविस्तर वृत्त असे की, 27 एप्रिल ते 15 मे या दरम्यान वाणिज्य द्वितीय वर्षाची परीक्षा घेण्यात आली. विद्यापीठाच्या नियमानुसार 45 दिवसात निकाल लावण्यात येतो. परंतु हा निकाल 25 जुलैला लागला म्हणजे हा निकाल 45 दिवसांवरून 70 दिवसांवर गेला. या निकालामध्ये महाविद्यालयातील 53 विद्यार्थी नापास झालेत. जवळपास ३० विद्यार्थ्यांना शून्य मार्क्स मिळाले. यामध्ये इतर विषयांत 70% टक्के मार्क मिळणारे विद्यार्थी नापास झाले. पेपर योग्य पद्धतीने सोडविल्यानंतरही आपण नापास का झालो? या संभ्रमात विद्यार्थी दिसून येत आहे.
याकरिता विद्यार्थ्यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठावर थेट असा आरोप केला की, विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे आम्ही नापास झालो. त्यामळे आमच्या इंग्रजी विषयाच्या पेपरचे मूल्यांकन पुन्हा अमरावती विद्यापीठाने करावे. तसेच 10 दिवसांच्या आत निकाल लावावा. कारण पुढील शिक्षणासाठी प्रवेश लवकरच बंद होणार आहे. जर हा निकाल एक महिन्यानंतर लागला तर विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे शैक्षणिक नुकसान होईल. अशा काही मागण्या विद्यार्थ्यांनी निवेदनातून प्राचार्यांना केली.