गुरुजी! टिकवायची कशी, शिकवायची कशी शाळा?

कुठे विद्यार्थ्यांचा तर कुठे शिक्षकांचा अभाव, शाळा धोक्यात

0

सुशील ओझा, झरी: आजच्या युगात मराठी माध्यमांच्या शाळेला उतरती कळा आली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे पालकांची धाव मोठ्या प्रमाणात आहे. शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळेला टक्कर देण्याकरिता महाराष्ट्रातील अनेक शाळा डिजिटल केल्या. शिक्षकांना प्रशिक्षण देऊन मुलांना इंग्रजी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु तालुक्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची कमी आहे. अनेक जागा रिक्त आहे ज्यामुळे शिक्षणाचा बोजवारा झाला.

मुलांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. विद्यार्थी नसल्याने खडकी येथील जिल्हा परिषद शाळा बंद झाली. उर्वरित शाळांचे विद्यार्थी टिकवून ठेवण्याकरिता शिक्षण विभाग, जिल्हा परिषद व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा पुढच्या सत्रात तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘गुरुजी! टिकवायची कशी, शिकवायची कशी शाळा!’ असाही सवाल उपस्थित होत आहे.

तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे गाव अडेगाव येथे वर्ग ६ व ७ वि करिता एकही शिक्षक नसल्याने विद्यार्थांचे भविष्य अंधारात दिसत आहे. सत्र सुरू होऊन चार महिने झाले. फक्त समाजसेवा शिकवणारे एकच शिक्षक असून दोन शिक्षकांची पदे रिक्त आहेत. इंग्रजी गणितासारखा विषय शिकविणारेच शिक्षक नसल्याने ग्रामवासियांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अडेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ५ पर्यंत २७८ विद्यार्थी ६ व ७ वी मधील ७७ विद्यार्थी असे एकूण ३५५ असून ३५५ विद्यर्थांकरिता फक्त ९ शिक्षक कार्यरत असून बाकी शिक्षकांची जागा रिक्त आहे.

शाळेत पटसंख्येनुसार शिक्षक भरती नसल्याने ग्रामवासियांत संताप आहे. शिक्षणविभाग मुलांच्या भविष्याशी खेळत असल्याची ओरड केली जात आहे. शाळेत वर्ग १ ते ५ करिता १० शिक्षक ६ व ७ करिता ३ शिक्षक व उच्च श्रेणीय मुख्याध्यापक असे पदे मंजूर असताना फक्त ९ शिक्षक कार्यरत असून ४ पदे रिक्त आहे.

शाळेतील शिक्षकच्या रिक्त जागा भरण्याकरिता शाळा व्यवस्थापन समिती सरसावली असून त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन शिक्षकांची मागणी केली आहे परंतु आठवडा लोटूनही एकही शिक्षक अजूनही मिळाला नसल्याने अडेगाव वासियात प्रचंड संताप व्यक्त होत आहे शिक्षकाची जागा त्वरित भरा अशी मागणी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग झाडे सदस्य विलास देठे,संतोष बावणे, मोहन कोटनाके सह गावकऱ्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.