सुशील ओझा, झरीः तालुक्याती गणेशपूर येथील नानाजी साधू निखाडे यांना वीज वितरण कंपनीने चक्क सव्वा लाखाचे वीज बिल पाठवले. साध्या कुडाच्या घरात राहणाऱ्याला आलेले एवढे बिल पाहून कंपनीची हलगर्जी समोर आली. मजुरी करून आपले पोट भरणाऱ्या या सामान्य माणसाला हा कंपनीचा मोठा दणकाच होता.
कपंनीने त्याला 1,27,860 रूपयांचे बिल पाठवले. हे तीन महिन्यांचं एका छोट्याशा झोपडीवजा घराचं बिल होतं. कंपनीच्या कार्यालयात चकरा मारून हा मजूर हताश झाला. शेवटचा उपाय म्हणून तो शेतकरी विद्युत परिषदेचे संजय देरकर यांच्याकडे गेला. त्यांना सर्व परिस्थितीचं वास्तव सांगितलं.
वीज वितरण कंपनी आपल्या स्वतःच्याच चुकांवर पांघरून घालत आहे. कर्मचारी हे सदर इसमाकडे वारंवार जाऊन बिल भरण्यासाठी तगादा लावत आहेत. या बेबंदशाहीला फटकारत संजय देरकर यांनी वीज वितरण कंपनीला निवेदन दिले. या गरीब मजुरावरील हे संकट दूर करावं असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.