संघर्ष यात्रेचा झरी येथे समारोप, यात्रेत विविध ठराव पारीत

आदिवासींच्या हक्कांवर गदा आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

0

निकेश जिलठे, वणी: विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या आदिवासी समाजाच्या संघर्ष यात्रेचा झरी येथे शुक्रवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी समारोप झाला. पेसा कायद्याची कडक अंमल बजावणी करा. अनुसुची 5 व 6 संपूर्ण राज्यात लागू करा. वनहक्क कायद्याची कठोर अंमलबजावणी करा. अशा विविध मागण्या घेऊन वणी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी समाजतर्फे वणीत स्वातंत्र्य दिनी संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. शुक्रवारी मारेगाव तालुक्यात भ्रमण करून संध्याकाळी यात्रेचा झरी येथे समारोप झाला. या रॅलीत वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील पाडे, तांडे, खेडेगाव, शहर इत्यादी भागातून हजारो बांधवांनी सहभाग घेतला. डॉ. महेंद्र लोढा यांनी या रॅलीचे नेतृत्व केले.

वणीवरून निघालेली संघर्ष यात्रेने मांगरुळ येथे मुक्काम केला. दुस-या दिवशी शुक्रवारी यात्रेने मारेगाव येथे प्रस्तान केले. मारेगाव येथील प्रमुख मार्गावर मार्गक्रमण करून मार्डी चौकात सभा झाली. त्यानंतर ही यात्रा घोन्सा मार्गे झरीला गेली. या रॅलीत आदिवासी समाजातील लोक पारंपरिक कपडे व पारंपरिक वाद्ये घेऊन सहभागी झाले. वाजत गाजत ही यात्रा निघाली. संध्याकाळी सहा वाजता झरीमध्ये हजारो आदिवासी बांधवांनी रॅली काढली. त्यानंतर समारोपीय सभा झाली.

समारोपीय भाषणात बोलताना डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की…

सरकारला फक्त अंबाणी अदाणी या सारख्या उद्योगपत्यांची काळजी आहे. पाड्या तांड्यावर राहणा-या माझ्या आदिवासी बांधवांचा विकास करणे तर दूरच उलट सरकार त्यांचे हक्क हिरावून घेत आहे. त्यांना संविधानाने दिलेले अधिकार फडणवीस सरकार काढून घेत आहे. हजारोंच्या संख्येने संघर्ष यात्रा काढून आम्ही सरकारला एक प्रकारे इशारा दिला आहे. जर आदिवासी बांधवांच्या हक्कांवर गदा आली तर आदिवासी बांधून पेटून उठेल. संघर्ष ही केवळ एक सुरुवात आहे. आदिवासी बांधवाच्या हक्काला थोडा जरी धक्का लागला तर यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाऊन सरकारला धडा शिकवला जाणार.

दरम्यान सभेत कॉ. गीतघोष, डॉ. सुनील जुमनाके यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात्रेच्या शेवटी विविध ठराव पारीत करण्यात आले. या यात्रेला हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक ऍड अरविंद सिडाम यांनी केले तर आभार इरफान खान यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.