दोन महिन्याचे दोन खोल्यांचे बिल 1 लाख 18 हजार
गरीब महिलेची कंपनीकडन थट्टा, वीज पुरवठा केला खंडीत
विवेक तोटेवार, वणी: महावितरण कंपनी कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत राहते. एका गरीब कुटूंबालातील महिलेला दोन महिन्याचे बिल तब्बल 1 लाख 18 हजार रुपये पाठवून महावितरण पुन्हा आपल्या भोंगळ कारभारातून चर्चेत आला आहे. सदर महिला ही कपडे शिवूना आपला उदरनिर्वाह करते. हे बिल पाहून महिला ही वितरण कंपनीत गेली. मात्र तिच्या घरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती आहे.
संध्या बापूराव घोंगे ही महिला वणीतील शिवाजी चौकात राहत असून ती टेलरिंगचे काम करून कसाबसा आपला उदरनिर्वाह चालविते. ती तिच्या मालकीच्या टिनाच्या दोन खोल्या असलेल्या घरात राहते. मे महिन्याच्या अगोदर मीटर बंद असल्याने तिला ऍव्हरेज बिल देण्यात येत होते. तिने याबाबत विधुत विभागात तक्रारही दिली. परंतु याचे काहीही करण्यात आले नाही. नंतर मी महिन्यात महिलेच्या घराचे विद्युत मीटर बदलण्यात आले. त्यानंतर तिला तब्बल 1 लाख 5 हजाराचे बिल पाठविण्यात आले. सदर बिल तिला मिळलेले नाही.
त्यानंतर दुसऱ्या महिण्यात मागील बिल जोडून 1 लाख 18 हजार 400 रुपयांचे बिल पाठविण्यात आले. इतके बिल कसे आले म्हणून याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर 25 हजार 620 रुपयांचे बिल भरण्यास सांगण्यात आले. जोपर्यंत बिल भरल्या जात नाही तोपर्यंत वीज मिळणार नाही अशी टोकाची भूमिका महवितरण कंपनीने घेतली आहे. विशेष म्हणजे संध्या यांच्या विधुत मीटरमध्ये रिडींग हे 963 दाखविले आहे. एवढ्या युनिटचे बिल इतके कसे आले याबाबत परिसरात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. या प्रकरणी न्याय मिळावा अशी अपेक्षा ही गरीब महिला व्यक्त करीत आहे.