माझे जगणेच माझी कविता झाली- इरफान शेख

नगर वाचनालयात आयोजित या व्याख्यानात प्रतिपादन

0

बहुगुणी डेस्क, वणी: मी जे भोगले, जगलो ते माझ्या कवितेत उतरलं आहे. ज्यांनी ज्यांनी या कविता वाचल्या त्यांना हे जगणं, भोगण हे आपलं वाटलं म्हणून माझ्या कवितांना वलय मिळाले. माझे जगणेच माझी कविता झाली. त्यामुळे कवितेने माझे बोट धरून ठेवावे. तेव्हा माझी कविता समर्थ सक्षम होत जाईल अशी अपेक्षा चंद्रपूर येथील युवा कवी इरफान शेख यांनी व्यक्त केली. ते लोकनायक बापूजी अणे यांच्या 139 व्या जयंती निमित्त येथील विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालयातर्फे आयोजित ‘माझे जगणे माझी कविता’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते.

नगर वाचनालयात आयोजित या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ वणी शाखेचे अध्यक्ष प्रा. दिलीप अलोणे हे होते. यावेळी नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.

आपला विषय मांडताना इरफान शेख पुढे म्हणाले की, माझ्या कौटुंबिक वाईट स्थिती मुळे माझी संवेदनशीलता अधिक दृढ झाली. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटलेल्या प्रत्येक व्यक्तींनी केलेल्या सहकार्यामुळे व त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमामुळे माझ्या जीवनाला आकार मिळाला. ‘माझ्यातला कवी मरत चाललंय’ या त्यांच्या प्रसिद्ध कवितासंग्रहाला महाराष्ट्रातील विविध प्रतिष्ठित 12 साहित्य संस्थांनी गौरवीत केले. यातील त्यांच्या कविता विद्यापीठाच्या अभासक्रमाला सुद्धा लागलेल्या आहेत.

इरफानने आज त्यांच्या जीवनाचा संघर्ष उलगडला. जीवनात ज्यांनी काळाकुट्ट अंधारच पहिला, त्या अंधाराच्या व्यथा, वेदना कवितेच्या रूपात सकारात्मकरीत्या त्यांनी मांडल्या. ही त्यांची मोठी उपलब्धी आहे. असे मत अध्यक्षीय भाषणात प्रा. दिलीप अलोणे यांनी व्यक्त केलं.

या प्रसंगी पाहुण्यांचा परिचय शाखेचे उपाध्यक्ष गजानन कासावार यांनी करून दिला. सूत्रसंचालन सचिव अभिजित अणे यांनी केले. आभार प्रदर्शन कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर वाचनालयाचे ग्रंथापल देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार पूजा नाईक यांनी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.