मेंढोली – शिरपूर रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात

"मोबाईल कंपनीचा प्रताप अन वाटसरूंच्या डोक्याला ताप"

0
विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील मेंढोली ते शिरपूर रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात झाला. ही घटना पोळ्याच्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात मेंढोली येथील सुधाकर दत्तू कुटारकार वय ४५ आणि प्रमोद भीमराव पुसनाके वय २२ हे दोघेही गंभीर जखमी झाले आहे.
वणी तालुक्यात ठिकठिकाणी मोबाईल कंपनी द्वारे भूमिगत केबल टाकण्याची कामे सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या कडेला केलेल्या खोदकामाची माती वाहतुकीच्या रस्त्यावर टाकली जात आहे. मात्र मातीची योग्य विल्हेवाट लावल्या जात नाही. परिणामी माती वाहतुकीच्या रस्त्यावर पसरून अपघात घडत आहेत. यात सामान्य माणसाचं मात्र नुकसान होत आहे.
शिरपूर-मेंढोली रस्त्याची दुरवस्था
पोळ्याच्या दिवशी सायंकाळी मेंढोली येथील सुधाकर कुटारकार आणि प्रमोद पुसनाके दोघेही कामानिमित्त शिरपूरला जाण्यासाठी दुचाकीने निघाले. परंतु त्यांची दुचाकी मेंढोली पासून १ किलोमीटर अंतरावर मातीमुळे घसरून अपघात झाला. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहे. सदर जखमी युवकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे लोकवर्गणीतून उपचारासाठी निधी गोळा केल्या जात आहे.

एकूणच “मोबाईल कंपनीचा प्रताप अन वाटसरूंच्या डोक्याला ताप” अशी अवस्था निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वाहतुकी योग्य रस्त्याचे तीनतेरा वाजत आहे. मात्र संबंधित अधिकारी मुग गिळून गप्प बसले आहे. मेंढोली येथील युवकांच्या अपघाताला मोबाईल कंपनीचेच काम जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. सदर बाबींवर नियंत्रण ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी आणि निवडणुकीच्या वेळी मतांचा जोगवा मागणाऱ्या लोकप्रतिनिधिंनी सदर बाबीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.