गटप्रवर्तक पदाकरिता पात्र आशासेविका झाल्या अपात्र
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आशा वर्कर्समधे संताप
सुशील ओझा, झरी: शासनाने १० ऑगस्ट २०१६ च्या सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र यांच्या पत्रानुसार आदेश पारित करण्यात आले होते की ३१ ऑगस्ट पर्यंत गटप्रवर्तक निवडण्याचे पत्र काढण्यात आले. दोन वर्ष लोटल्यानंतर १६ सप्टेंबर २०१९ ला गटप्रवर्तकाच्या जागा भरण्याकरिता झरी येथील आरोग्यविभाग कार्यालयात गटप्रवर्तकांच्या जागा भरण्याचे हेतूने मुलाखती घेण्यात आल्यात.
शासनाने आरोग्य विभागाकरिता सहकार्य करणाऱ्या आशा वर्कर्स यांच्या नियुक्त्या केल्या. तालुक्यात गेल्या ११ वर्षांपासून आशा वर्कर्स आदिवासीबहुल तालुक्यात सतत कार्य करत सेवा देत आहे. आशा वर्कर ह्या विविध पदावर कार्यरत आहे.
शासनाच्या अटीनुसार ४० वर्ष असलेल्या आशा अपात्र असतात. त्या अनुषंगाने सन २०१६ मध्ये ३८ वर्षांची आशा आज ४० वर्षाची झाल्याने आपोआप अपात्र झाली. ज्यामुळे आशा वर्करमधे प्रचंड नाराजी आहे. शासनाच्या चुकीमुळे दोन वर्षांपूर्वी गटप्रवर्तक पदावर राहणारी आशा आज अपात्र झाली.
तसेच १६ सप्टेंबर २०१९ रोजी झरी येथील आरोग्यविभाग कार्यालयात घेण्यात आलेल्या मुलाखतीत काही आशा अपात्र करण्यात आल्याची यादी लावण्यात आली. परंतु शालेय टीसी वरून सदर महिला पात्र असताना त्यांना अपात्र करण्यात आले. सदर मुलाखतीमध्ये घोळ झाल्याचा संशय काही आशासेविकांनी केला.
वरील विषयाची सखोल चौकशी शासनाने करावी, दिलेल्या १६ सप्टेंबरच्या मुलाखती रद्द करून १० ऑगस्ट २०१६च्या शासनाच्या आदेशाप्रमाणे नियुक्त्या करण्यात याव्यात, अशा मागणीवजा तक्रारी करून न्याय देण्याची मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे केली. राधा लिक्केवार, गंगा काटकर, विजया आत्राम, बेबी आत्राम, ममता माहूरे, विमल सुरपाम, शोभा घाटे, सारिका येरमे, रत्नमाला वडस्कर यांनी तसे निवेदन दिले.