पाटण पोलीस स्टेशनचे वाहनचालक खापणे यांचा आजाराने मृत्यू
नातेवाईक आणि पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशनमध्ये वाहनचालक म्हणून कार्यरत असलेले संतोष खापणे (30) यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. खापणे हे सन २००८ मध्ये पोलीस खात्यात भर्ती झाले. ११ वर्ष पोलीस खात्यात काम केले. एका वर्षापूर्वी त्यांची बदली तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन मध्ये झाली. ते येथे चालक म्हणून कार्यरत होते.
गेल्या ६ महिन्यांपासून त्यांची प्रकृती खराब होती. पिलिया झाला होता. त्यांचे उपचार खाजगी दवाखान्यात सुरू होते. गेल्या काही महिन्यांपासून ते उपचाराकरिता रजेवर होते. सावंगी मेघे येथे उपचार सुरू असताना २२ सप्टेंबर ला रात्री ११.३० वाजता त्यांची प्राणजोत मालवली. संतोष खापणे यांनी यापूर्वीही पाटण पोलीस स्टेशनला काही दिवस कार्य केले होते.
त्यांचे वडीलही पोलीस खात्यात पाटण पोलीस स्टेशनला कार्य बजावून गेले हे विशेष. संतोष यांच्या मृत्यूने पोलीस खात्यासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूची माहिती कळताच पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार, कर्मचारी तसेच विभागातील पोलीस कर्मचारी अंत्यविधीकरिता हजर झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
मृतक संतोष शालीक खापणे यांचे मूळ गाव मंदर आहे. त्याचे वडील शालीक खापणे हे वणीच्या नृसिंह व्यायाम शाळेचे कुस्तीपटू होते. पांडुरंग लांजेवार यांच्यासोबत नेहमी कुस्तीचा सराव करायचे.