बहुगुणी डेस्क, अमरावती: ‘द कॉलेज ऑफ अनिमेशन बायोइंजिनियरिंग एन्ड रिसर्च सेंटर अमरावती’ तर्फे आयोजित ‘मैफिल ए गझल’, प्रस्तुतकर्ते डॉ. कुणाल इंगळे, सह्योगी प्राध्यापक, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या मराठी, हिंदी, उर्दू गझलांच्या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मैफिलीच्या सुरवातीला शहरातील काही ज्येष्ठ व युवा गझलकारांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये प्रा. अरुण सांगोळे, श्री. बबन सराडकर, प्रा. श्री. संजय घरडे, श्री. पवन नालट या सारख्या गझलकारांचा समावेश होता.
गझल, काव्य लेखनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मा. श्री. मुरलीधर चांदेकर आवर्जून उपस्थित होते. सोबतच माजी लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई, माजी राज्यमंत्री डॉ. श्री. सुनील देशमुख, लाचलुचपत खात्याचे पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या मैफिलीला उपस्थिती दर्शविली. प्रस्तुत कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्री. राजीव बोरकर, अकोला यांनी केले. व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. श्री. विजय राऊत, प्राचार्य ‘द कॉलेज अनिमेशन ऑफ बायोइंजिनियरिंग एन्ड रिसर्च सेंटर अमरावती’ यांनी केले.
या गझल मैफिलीत प्रा. डॉ. श्री. कुणाल इंगळे यांनी मराठी, हिंदी, उर्दू या तिन्ही भाषेत गझल सादर केल्या व रसिकांची मने जिंकली. अतिशय गार वातावरण असतांना देखील प्रेक्षकांनी थंडीची तमा न बाळगता कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली हे विशेष. सुरेश भट यांच्या द्वारे रचित व गुरुवर्य प्रा. डॉ. श्री. परशुराम कांबळे यांनी स्वरबद्ध केलेली ‘’आसवांचे जरी असे झाले हे तुला पाहिजे तसे झाले’’, श्रीकृष्ण राऊत यांची ‘’तुझ्या हासण्याचे दिवाणे किती’’,
श्री. अशोक थोरात यांची ‘’प्रेम असेही असते का?’’ अशा मराठी भाषेतील अनेक गझल तर हिंदी, उर्दू गझलांमध्ये ‘’अभी जो धूप निकलने के बाद सोया है’’, डॉ. बशीर बद्र यांची ‘’वो चांदनीसा बदन’’, ‘’होशवालो को खबर क्या बेखुदी क्या चीज है’’, हम तेरे शहर मे आये है मुसाफिर कि तरह’’ अशा अनेक रिकॉरडेड व स्वरचित गझला गाऊन प्रा. डॉ. श्री. कुणाल इंगळे यांनी श्रोत्यांची वाह वाह मिळविली व रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आवाजाचा अतिशय वेगळा ढब, स्वर लावण्याची सुरेल पद्धत, सरगमेचा उपयोग, भावप्रधानता, गझलेच्या आशयानुसार सादरीकरण, लय व सुरांवर विशेष पकड, उत्कृष्ठ स्वरबद्ध केलेल्या गझला व गायकीच्या नव्या अंदाजामुळे डॉ. कुणाल इंगळे यांचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले व दाद दिली.
या मैफिलीला जगप्रसिद्ध गझल गायक श्री. अनुप जलोटा, मुंबई, गझल नवाज श्री. भीमराव पांचाळे, मुंबई. आणि शास्त्रीय संगीताचे ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांनी खास शुभेच्छा पाठविल्या होत्या. या मैफिलीत सितार करिता आकाशवाणीचे उच्च श्रेणीचे कलाकार श्री. नासीर खान, नागपूर, तबल्या करिता श्री. देवेंद्र यादव, हार्मोनियम करीता श्री. अजय हेडाऊ, बासरी करिता श्री. रवींद्र खंडारे व कीबोर्ड वर श्री. सचिन गुढे यांनी सुंदर साथ दिली व श्रोत्यांची वाह वाह मिळविली. छत्तीसगड वरून खास या मैफिलीत निवेदन करण्यासाठी आलेले पियुष वासनिक प्रस्तुत कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
या कार्यक्रमाच्या आयोजनात आयोजन समितीचे अध्यक्ष असलेले डॉ. श्री. विजय राऊत सर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याच बरोबर सिंफनी ग्रुपचे अध्यक्ष श्री. सचिन गुढे यांचा सुद्धा हा कार्यक्रम आयोजित करण्यात सिहाचा वाटा राहिला. या व्यतिरिक्त या मैफिलीच्या आयोजन समितीचे सचिव असलेले श्री. नरेंद्र गुलदेवकर तसेच श्री. मिथिल कळंबे, निलेश गायकवाड, श्री. राहुल तायडे, श्री. उमेश अमलानी, श्री. जयंत वने [ सहायक आयुक्त, फूड एन्ड ड्रग्ज], श्री. गुरुमूर्ती चावली, डॉ. नैना बहुरूपी, डॉ. श्री. जयेश इंगळे, सचिन सूर्यवंशी, श्री. चंद्रकांत मोंढे, श्री. कुणाल कुदडे, श्री. राजाभाऊ राऊत, सुधीर वानखडे, विजय शर्मा, प्रा. हर्षवर्धन मानकर, संजय तायवाडे, आनंद गजभिये, गजेंद्र बिहाडे, शिवराज शिंदे आदींच्या अथक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.