सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मुकुटबन येथे अनुसूचित जाती महिला आरक्षण निघाले आहे. सदर आरक्षणामुळे दिग्गजाच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे.
मुकुटबन ग्रामपंचायतमध्ये पाच वॉर्ड असून, १५ सदस्य आहे. गावाची लोकसंख्या १२ हजारांच्या वर असून, पाच हजारांवर मतदार आहे. मुकुटबन येथे काँग्रेस, शिवसेना व भाजपमध्ये दोन गट असून, सर्वांनाच आपल्या गटाकरिता सुशिक्षित व चांगले विकासकाम करणारी महिला शोधण्याचे आवाहन आहे.
ग्रामपंचायत सरपंचपदाकरिता पहिल्यांदाच अनुसूचित जातीची महिला आरक्षण निघाले असून, अनेक महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मुकुटबन येथे काँग्रेस, शिवसेना सरपंच शंकर लाकडे व आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे भाजपचे वेगवेगळे दोन गट आहे. लाकडे यांनी पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा देऊन ग्रामपंचायतमध्ये १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करून सर्वांना निवडून आणले होते.
लाकडे हे सरपंचपदी विराजमान झाल्याने आमदाराच्या गटाला हादरा बसला होता. सरपंचाने गावात विविध विकासकामे केली आहे. यावर्षी होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदाकरिता अनुसूचित जाती महिला राखीव आरक्षण निघाले. त्यामुळे मुकुटबनची निवडणूक चुरशीची होणार आहे.