सुनील पाटील, वणी: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने संपुर्ण राज्यात संचारबंदी घोषीत केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. पंरतु सोशल डिस्टंसींग व संचारबंदीचे नियम धाब्यावर ठेवून वावरणा-या 20 व्यक्तींवर पोलीसांनी विविध कलमान्वये कार्यवाही केली होती. प्रकरण न्यायप्रविष्ठ केले असता न्यायालयाने 2 हजार रुपये दंडाची शिक्षा व तो दंड न भरल्यास 10 दिवसाचा कारावास ठोठावल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.
वणी शहरात पोलीसांनी नियमांचे उल्लंघन करणा-या पान टपरी चालक, दारु व्यवसायीक, भाजी विकणारे तसेच मास विक्रेते व विनाकारण संचारबंदीचे उल्लंघण करणारे दुचाकीस्वार यांचेवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई केली होती व करताहेत. पोलीस प्रशासनाने अनेक वेळा नागरीकांना सुचना दिल्यानंतरही लॉकडाऊनचा फज्जा उडविल्या जात असल्याने बळाचा वापर सुध्दा करण्यात आला आहे.
शहरातील नियमांचे उल्लंघन करणा-यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोऊनि गोपाल जाधव, डी. बी. पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाडे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, अमित पोयाम तसेच नगर परिषद आरोग्य निरिक्षक भोलेश्वर ताराचंद यांचे पथकाने कारवाई करुन भादवि कलम 269, 188 अन्वये कारवाई करुन प्रकरण न्याय प्रविष्ठ केले.
संचारबंदीचे उल्लंघण करणा-यांना शिक्षेची पहिलीच मोठी कारवाई
वणी प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायाधीश के. के. चाफले यांनी संचारबंदीचे उल्लंघन करणा-या विस जणांना 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली असुन दंड न भरल्यास दहा दिवस कारावास भोगावा लागणार आहे. सदर कारवाई ही संचारबंदी दरम्यान न्यायालयाने केलेली राज्यातील पहिलीच मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
कोरोना विषाणूजन्य आजाराने संपुर्ण जग कवेत घेतले आहे. या आजारांमुळे मोठया प्रमाणात जीवीतहानी होतांना दिसत आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्या करीता व कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय शासना समोर असल्याने संपुर्ण शहरात संचारबंदी लावून नागरीकांना घरीच राहण्याचा सल्ला सर्वचस्तरांतुन देण्यात येत आहे.
वणी शहरात महसुल, पोलीस व नगर पालीका प्रशासन याकरीता ठोस उपाय योजना करताहेत. उप विभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार वैभव जाधव यांनी शहरात ठिकठिकाणी गस्त लावली आहे तर शासन नियमांचा भंग करणा-यांवर कारवाई करण्यात येत आहे.