स्वा.सावरकर शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू
व्हॉट्सऍप गृपच्या माध्यमातून मुलांचे क्लास...
बहुगुणी डेस्क, वणी: येथील स्वा. सावरकर नगर परिषद शाळा क्र.5 वणी ही महाराष्ट्र्रातील इतर शाळेप्रमाणे 16 मार्च पासून शासनाच्या आदेशानुसार पूर्णपणे बंद आहे. या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. या लॉकडाउनचा विद्यार्थ्यांना सकारात्मक फायदा व्हावा यासाठी नगर परिषद शाळा क्र. 5 या शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग या शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार यांच्या पुढाकाराने सुरू झाले आहे.
या विद्यालयात के. जी. 1 पासून 8 व्या वर्गापर्यंत आहे. हा उपक्रम सुरू व्हायच्या आधी मुख्याध्यापकांनी शाळेतील सर्व पालकांशी फोन वरून संपर्क साधून या शाळेमार्फत सुरू करण्यात येत असलेल्या उपक्रमाविषयी माहिती देऊन या काळात आपापल्या मुलांना मोबाईल देऊन कशा प्रकारे काळजी घ्यायची या विषयी चर्चा करून शाळेतील प्रत्येक वर्गशिक्षकांना संपर्क साधायला सांगितला.
वर्ग शिक्षकांनी आपापल्या वर्गाचे व्हाट्सएप ग्रुप बनवून रोज नवीन अभ्यास करून घेऊन चाचणी सोडवून घ्यायला सुरुवात केली आहे. ऑनलाईन शिकवणीसाठी विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे. प्रत्येक पालक घरीच असल्यामुळे एखाद्या शिक्षकांना अभ्यास द्यायला उशीर झाल्यास विद्यार्थ्यांचे फोन येणे सुरू झाले आहे. शाळेला सुट्टी असूनही विद्यार्थ्यांची प्रगती पाहून पालक वर्ग खूप आनंदी आहे.
या शाळेतील शिक्षकांकडून इंग्रजी, मराठी विषयांचे साध्या, साध्या शब्दांच्या जुळवणी पासून तर लेखन व वाचनाचा सराव चित्रफिती द्वारे घेण्यात येत आहे. कोडे सोडवणे, सामान्य ज्ञानाची चाचणी, गणितीय क्रिया, उद्बोधक गोष्टी या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे सुरू आहे.
या साठी मीना काशीकर, रजनी पोयाम, प्रेमदास डंभारे, अविनाश तुंबडे, गीतांजली कोंगरे, दर्शना राजगडे परिश्रम घेत आहेत. या उपक्रमामुळे नगर परिषदेतील शाळेचे विद्यार्थी अधिक प्रगत होतील असा विश्वास नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, मुख्याधिकारी संदीपकुमार बोरकर, शिक्षण सभापती अक्षता चव्हाण, प्रशासन अधिकारी संजय पवार यांनी व्यक्त केला आहे.