बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील गुरूनगर येथील रहिवाशी असलेल्या गंगाधर नानाजी मिलमिले या शेतक-याने मुख्यमंत्री सहायता निधीला 51 हजारांची मदत केली. सोमवारी 13 एप्रिल रोजी त्यांनी वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना 51 हजारांचा चेक सुपुर्द केला.
सध्या कोरोनामुळे देशावर मोठे संकट आले आहे. व्यापार, उद्योगधंदे बुडाले आहे. आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) या नावाने अकाउंट उघडण्यात आले आहे. या सहायता निधीत मदत करण्यासाठी राज्यभरातून ओघ सुरू आहे. त्यात वणीकर ही मागे नाही. गुरूनगर येथील रहिवाशी असलेले गंगाधर मिलमिले यांची शिरपूर येथे शेती आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. या आपत्तीमध्ये मदतीसाठी आपलाही थोडाफार हातभार लागावा या उद्देशाने मिलमिले यांनी सीएम फंडाला मदत केली. त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.
वणीकरांकडून मदतीचा ओघ सुरू
वणीतील सामाजिक कार्यकर्ते अखिल सातोकर यांनी त्यांच्या मुलीच्या नावे 11 हजारांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला केली. त्यांची मुलगी वेदलक्ष्मी ही 11 महिन्याची झाल्याच्या निमित्ताने त्यांनी 11 हजारांचा चेक एसडीओ यांच्याकडे जमा केला. तर प्रगती नगर येथील रहिवासी असलेले राजेश पहापळे यांची मुलगी सानवी हिने पाचव्या वाढदिवसानिमित्त जमा केलेले खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला दिले.
वनिता समाजा तर्फे पी. एम. फंडाला 11000 / रूपये
वणीतील सामाजिक संस्था वनिता समाजातर्फे 11000 रूपये पी. एम. केअर फंडाला दिले. संस्थेच्या अध्यक्षा भारती सरपटवार व सचिव शरयू शुक्ला व अनुश्री देशपांडे यांनी प्रसिध्दी पत्रका द्वारे ही माहिती दिली.