जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी मध्यत्री कुंभा येथे दारूची अवैधरित्या तस्करी करणा-या सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी साडे सात लाखांची देशी दारू जप्त केली. तर सुमारे 24.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे यातील एक आरोपी हा वणीतील नगरसेवक आहे. या प्रकरणी एक आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आली. लॉकडाऊन दरम्यानची ही सर्वात मोठी कार्यवाही असल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर वृत्त असे की कुंभा येथे जयस्वाल यांचे देशी दारूचे दुकान आहे. वणी क्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार यांना शुक्रवारी मध्यरात्री या दुकानातून दारूची तस्करी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. वणीतील छोटू उर्फ प्रशांत निमकर (32) हा या दुकानातून वणीत विक्रीसाठी देशी दारू आणणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. ना. पोलीस कॉन्स्टेबल विजय कुडमेथे हे आपल्या साध्या वेशात पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांना त्या परिसरात तीन वाहने उभे असलेले दिसले. यातील एका वाहनात दोन इसम बसलेले होते.
तर जयस्वाल यांच्या दारूच्या दुकानाच्या कुलुपाला उत्पादन शुल्क विभागाने लावलेले सिल व कुलुप फोडून काही इसम दारूच्या दुकानातून देशी दारूचे बॉक्स काढून स्कॉर्पिओ (MH 32-C 9099) व स्विफ्ट डिसायर (MH 29 BC 1616) या वाहनात भरताना दिसून आले. त्यांनी लगेच तिथे धाड टाकली. पोलिसांनी धाड टाकल्याची समजताच घटनास्थळी एकच खळबळ उडाली.
पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग…
धाड टाकल्यावर तिथे उभी असलेली तिसरी गाडी टाटा मान्झा (MH 29 AD-2383) यात बसलेले दोन इसम लगेच तिथून पसार झाले. पोलिसांनी या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्यांच्या गाडीला मदनापूर या गावाजवळ पकडले. त्या गाडीत राहूल अरुण जयस्वाल (37) राहणार मारेगाव हा होता. त्याच्या सोबत असलेला दुसरा व्यक्ती गोलू सरकार हा मात्र मात्र वेळाबाई-मोहदा येथे पळून गेल्याचे सांगितले.
धाड टाकलेल्या स्थळी पोलिसांनी पंचनामा केला. त्यांना देशी दारुच्या दुकानाजवळ उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ या वाहनात देशी दारूच्या 50 पेट्या आढळून आल्या. दुस-या वाहनात व दुकानात पाहणी केली असता तिथे ही मोठ्या प्रमाणात माल आढळून आला. पोलिसांनी ही संपूर्ण देशी दारू जप्त केली. या संपूर्ण मालाची किंमत 7,45,354 रुपये इतकी आहे. पोलिसांनी दारूसह या प्रकरणी वापरण्यात आलेले वाहनेही जप्त केले. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी 24,45,354 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी राहुल जयस्वाल (34) राहणाार मारेगाव, छोटू उर्फ प्रशांत निमकर (32) राहणार तेली फैल वणी, उमेश अरुण बहिरे (22) रा. जैन लेआऊट वणी, सागर सुरेश आसमवार (30) राहणार भीमनगर वणी, अल्ताफ लतीफ शेख (34) राहणार माळीपुरा वणी, राहुल पंढरी कुचनकर (28) राहणार तेली फैल वणी, विनोद दादाजी केळकर (33) राहणार कुंभा ता. मारेगाव यांना अटक केली आहे. तर गोलू सरकार उर्फ प्रतीक वडस्कर हा इसम पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
या सर्व आरोपींवर महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम 65 अ (ई) 82, 83 सहकलम 51 (ब) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 सहकलम 188, 269 भांदवी सहकलम 135 मपोका सहनियम कोविड-19 उपाय योजना 2020 नियम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या नेतृत्वात अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, उपनिरीक्षक अमोल चौधरी , मनोज बोडलकर, विजय वानखेडे, इकबाल शेख, रवी इसनकर, प्रदीप ठाकरे, संतोष कालवेलवार, आशिष टेकाडे, अशोक दरेकर, अतुल पायघन, विजय कुळमेथे यांनी केली. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक अमोल चौधरी करीत आहे.