विवेक तोटेवार, वणी: शहरातील साईनगरी येथील नव्याने बांधकाम होत असलेल्या एका घरात काही लोक जुगार खेळत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून पाच जणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून जुगारातील पैसे जप्त करून विविध कलमांनुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील ब्राह्मणी रोडवरील साईनगरी येथे जमीर शेख यांच्या फ्लॅट स्कीम जवळच केजीएन ट्रान्सपोर्टचे संचालक तारीख खान मुख्तार खान यांच्या घराचे अर्धवट बांधकाम सुरू आहे. याच घरात मागील तीन चार दिवसांपासून 8 ते 10 युवक जुगार खेळत असल्याची माहिती तेथील काही निवासी महिलांनी पोलीस ठाण्यात फोन करून माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गोपाळ जाधव आपल्या डी बी स्काड ला घेऊन त्वरित घटनास्थळी रवाना झाले. जुगारी तारीख खान यांच्या घरातील वरच्या बाजूला जुगार खेळत होते. पोलीस आल्याची चाहुल लागताच त्यांची तारांबळ उडाली. यातील तीन आरोपींनी आपल्या जिवाची पर्वा न करता वरून उडी घेऊन पळ काढला. मात्र पोलिसांनी खाली त्यांना पकडले.
या प्रकरणी गोलू उर्फ पावन यादव मच्छेवार (26) रा. इंदिरा चौक वणी, अहेमद अली समशेर अली (31) रा. साईनगरी वणी, रोशन कबीर कुरेशी (37) रा. काजीपुरा, शारीक उर्फ बबलू शेख (32) रा. साईनगरी, तारीख खान मुक्तार खान (35) साईनगरी या पाच जणांना घटनास्थळावरून अटक केली. हे सर्व आरोपी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अवहेलना करीत तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करीत जुगार खेळत होते.
या सर्व आरोपींवर जमावबंदी, संचारबंदी, आपत्ती व्यवस्थापन, जुगार प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मसुकाच्या कलम 4, 5 व भादंविच्या कलम 188, 269 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 51 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार वैभव जाधव डीबी प्रमुख गोपाळ जाधव, सुदर्शन वनोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, पंकज उंबरकर, दिलीप वाड्रसवार, अमित पोयाम यांनी केली.
एकता नगर येथील धाडीबाबत वणीत खमंग चर्चा
काल शनिवारी एकता नगर येथील जुगार अड्यावर पोलिसांनी धा़ड टाकली होती. मात्र या धाडीबाबत परिसरात वेगळीच चर्चा रंगली आहे. या जुगारात एका सत्ताधारी नगरसेवकाच्या भावाचा हात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे याबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहे. या प्रकरणात जाणीवपूर्वक कुणाला अभय तर दिले जात नाही अशी शंका या प्रकरणी व्यक्त केली जात आहे.