सलून व्यवसायाला परवानगी द्या… नाभिक समाजाचे साकडे
लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचना, सशर्त परवानगी देण्याची मागणी
बहुगुणी डेस्क, वणी: लॉकडाऊनमुळे सलून चालक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत, त्यामुळे काही वेळेसाठी सलून दुकान सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नाभिक महामंडळातर्फे करण्यात आली आहे. सध्या देशभरात “कोरोना’मुळे “लॉकडाउन’ व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वणी व परिसरातील सलून बंद आहेत. त्यामुळे आवश्यक अटींवर व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी नाभिक महामंडळ संघटनेने आमदारांकडे केली आहे.
आज नाभिक समाजाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची भेट घेत त्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. “कोरोना’ संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी शासनाने “लॉकडाउन’ केले असून, त्यामुळे सलून दुकाने 19 मार्चपासून पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा व्यावसायिकांपुढे ठाकला आहे.
95 टक्के सलून भाड्याच्या दुकानात आहेत. दुकानभाडेही आता कसे द्यावे, अशा विवंचनेत व्यावसायिक आहेत. त्यामुळे समाजाला कायद्याच्या बंधनात राहून जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी. सकाळी काही तास सलून सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली. प्रशासनानी घालून दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहून आम्ही व्यवसाय करू, असेही निवेदनात म्हटले
यावेळी नाभिक महामंडळ संस्थेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष शशिकांत ऊर्फ डुडडू नक्षिणे, तालुका अध्यक्ष विनोद धाबेकर निखील मांडवकर बंटी खटले उपस्थित होते.