शिक्षक म्हणतायेत ‘स्कूल चले हम’, संस्थाचालकांची मुजोरी
'वर्क फ्रॉम होम'ला ठेंगा, कर्मचा-यांचे 'वर्क फॉर्म स्कूल'
जब्बार चीनी, वणी: कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार शाळांना सुटी दिली आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना सुद्धा घरूनच काम करण्याची मुभा शासनाने दिली आहे. मात्र वणी व परिसरातील काही खासगी शैक्षणिक संस्थेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना विनाकारण बोलावण्यात येत असून त्यांच्याकडून असंबंध काम करून घेत असल्याचा आरोप शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी करीत आहे. या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली जात असून आम्हाला बाधा होण्याची भीती नाही का? असा संतप्त प्रश्नही विचारला जात आहे.
कोरोनाबाबत दक्षता घेण्याच्या दृष्टीने 3 मे पर्यंत विविध संस्था, शाळा, कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या वार्षिक तसेच महाराष्ट्रात काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, तर काही रद्द केल्या आहेत. वणी मधीलही शैक्षणिक संस्था 3 मे पर्यंत बंद राहणार आहेत. शहरातील शैक्षणिक संस्थांना प्रशासनांनी याविषयी माहिती देण्यासाठी शाळेच्या दर्शनीय भागात फलक लावून तसेच एसएमएसद्वारे पालकांना याबाबत माहिती दिली.
जिल्हाधिका-यांचा आदेश काय आहे ?
विद्यार्थी नसल्याने अध्यापनाचे काम नाही. या वेळेत ज्या शिक्षकांकडे जे ही काम होते. ते घरी बसुनच करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यवतमाळ यांनी 18 मार्चला एका पत्राव्दारे दिले आहे. अति महत्वाची किंवा खूप निकडीची जबाबदारी आहे असे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वगळता इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना शालेय व्यवस्थापनाच्या अथवा शासनाच्या प्राप्त सुचनांनुसार आवश्यक कामकाज घरून करण्याची मुभा राहण्याचेही या पत्रात नमुद केले आहे. मात्र, असे निकडीचे कोणतेही काम नसताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळा कॉलेजमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश संस्था चालकांकडून देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
संस्थाचालकांची मुजोरी…
शाळेतील कर्मचा-यांना फुकट पगार का द्यायचा अशा कुजकट मानसिकतेतून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना शाळेत बोलवले जात असल्याची माहिती मिळत आहे. एका शिक्षण संस्थेत तर चतुर्थ श्रेणीच्या कर्मचा-यांना साफसफाई, बागकाम, गवत कापणे यासारखे काम दिल्याचेही समोर आले आहे. संस्थाचालकांच्या या मुजोरीमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मात्र नोकरी जाण्याच्या भितीमुळे त्यांना तोंड दाबून बुक्क्यांच्या मार सहन करावा लागत आहे.
सोशल मीडियावरून शिक्षकांचा अन्यायाचा पाढा
शिक्षण संस्था चालकांना शिक्षकांना करोनाची लागण होऊ शकत नाही का, अशा आशयाच्या पोस्ट शिक्षकांकडून आता व्हायरल केल्या जात आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांशी संबंधीत विविध मॅसेज सोशल मीडियातून व्हायरल करून त्यांच्यावर बितलेल्या प्रकाराला वाट करून दिली जात आहे.
याबाबतीत नेमके काय आदेश आहे यासंबंधित प्र.गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की कोणत्याही शिक्षकाला शाळेत जाण्याची गरज नाही असे शासनाचे स्पष्ट आदेश आहे. पोषण आहार ही मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीने वाटायचे आहे.
तर महाराष्ट्राचा शासनाच्या 19 मार्चच्या एका पत्रात रोटेशन पद्धतीने 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग बोलवण्याची जबाबदारी संबंधीत शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याधापकांची राहील असे सुचित करण्यात आले आहे.