किराणा मालाच्या पासवर गुटख्याची तस्करी ?

माहिती मिळूनही कार्यवाहीस कानाडोळा केल्याचा आरोप

0

सुशील ओझा, झरी: बाहेरगावाहून किराणा व भाजीपाला आणण्यासाठी प्रशासनातर्फे संचार परवाना देण्यात आला आहे. या पासचा वापर गुटखा आणि सुगंधी तंबाखू आणण्यासाठी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मांगली व मुकूटबन येथील काही गुटखा तस्कर या पासचा दुरुपयोग करीत असून आणलेला माल मुकूटबनसह परिसरात 1900 ते 2200 रुपये घेऊन विक्री करीत असल्याची माहिती आहे.

Podar School 2025

लॉकडाऊनमध्ये सरकारने जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी पोलीस व महसूल विभागाकडून गाडीकरिता पास देण्यात आला आहे. पूर्वी पोलीस स्टेशनकडून 14 एप्रिल पर्यंतची मुदत टाकून पास देण्यात आले होते. त्यानंतर ऑनलाईन पास काढण्याकरिता सांगण्यात आले. परंतु अनेकांनी ऑनलाइन पास काढले नसल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या जुन्याच पासवर आजही वाहतूक करून सामान आणत असल्याची काही घटनांची माहिती मिळत आहे. तसेच पोलिसांच्या पासवर काही किराणा दुकानदार वणी येथून सुगंधीत गुटखा आणत असून त्याची मुकूटसह परिसरात 1900 ते 2200 रुपये घेऊन विक्री करीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मुकूटबन, मांगली, कायर, झरी येथे वणीवरून सुगंधी तंबाखू येत असल्याची बातमी वणी बहुगुणीने दिल्यावर मांगली व मुकूटबन येथील गुटखा तस्करांनी स्वतःची चारचाकी न नेता भाड्याची गाडी घेऊन किरणा मालाच्या नावावर गुटखा आणून विकत असल्याची माहिती आहे.

21 एप्रिल रोजी दुपारी खडकी येथील एक किरायाच्या चारचाकी वाहनाने मुकूटबनच्या एका दुकानदाराने वणी वरून मुकूटबन येथे 6 पेटी गुटखा किराणा सामानात आणला. परंतु त्याला शंका आल्याने त्या व्यापा-याने सर्व गुटखा पेटी दुकानात काढून ठेवली. याबाबतची पूर्ण माहिती पोलिसांना देण्यात आली. परंतु सदर दुकानदाराला वाचविण्याकरिता सदर दुकान खोलून तपासणी न करता अधिकारी सोबत नसल्याचे सांगून सदर गुटखा तस्कराला वाचविण्यात आल्याचा आरोप गावात होतोय. या संपूर्ण प्रकरणात सुमारे दीड लाखांची गुटखा तस्करी करण्यात आल्याची चर्चा परिसरात होत आहे. यात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असून अर्थपूर्ण व्यवहारामुळे त्यांना वाचवण्यात आल्याची चर्चाही जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.