शिबला येथील रेशन दुकानदाराचे मनमानी कारभार
एकाला 4 महिने तर दुस-याला 4 वर्षांपासून धान्याचे वाटप नाही
सुशील ओझा, झरी: शिबला येथील एका रेशन दुकानदारांचा मनमानी कारभार करीत असल्याचा अनेक तक्रारी रेशन कार्डधारक करीत आहे. याबाबत एकाने 4 महिन्यापासून रेशन देत नसल्याची तक्रार एसडीएम कडे केली असून सदर रेशन दुकांदारावर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
शिबला येथील श्याम विठ्ठल मडावी वय 40 वर्ष या युवकाची पत्नी आजाराने 4 महिन्यांपूर्वी मरण पावली. तिच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आहे. मुलीचे पालन पोषणची जवाबदारी श्यामवर आहे. लॉकडाऊन मुळे रोजमजुरी बंद झाली. हाताला कामे नसल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. मडावी याच्या जवळ अंत्योदय कूपन (272007722559) आहे. कुपन घेऊन स्थानिक रेशन दुकानात गेला असता तुझा अंगठा (थम्ब) लागत नाही ज्यामुळे तुला अन्नधान्य मिळत नाही असे सांगत चार महिन्यांपासून परत पाठवीत होता. पत्नी असताना धान्य मिळायचे व आता का नाही या शंकेमुळे त्यांनी एका सुज्ञ व्यक्तीकडून याबाबत तपासणी केली.
सदर कूपन क्रमांक ऑनलाईन चेक केले असता यात मार्च व एप्रिल २०२०चे अन्नधान्य उचलल्याचे आढळून आले. मडावी याने याबाबत एसडीएम यांच्या कडे रेशन दुकानदारच्या विरुद्ध लेखी तक्रार केली. माझा अंगठा लागत नाही तर माझ्या कुपणवरील अन्नधान्याची उकल कुणी केली असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
माझी पत्नी तर मरण पावली मग ती केव्हा येऊन अंगठा लावून गेली. तिने कधी धान्य उचलले असे प्रश्न त्यांनी उपस्थित करत हे धान्य रेशन दुकानदाराने मडावी यांनीच उचलल्याची तक्रार त्यांनी केली.
याच अनुषंगाने तहसील कार्यालयातून मसराम हे चौकशी करिता आले व मडावी यांच्या आई वडिलांचे बयाण घेतले गेले. तक्रारकर्ता श्याम असून त्यांचे बयाण न घेता त्याच्या आई वडिलांचे बयाण घेण्यात आले हे विशेष.
चौकशी दरम्यान सरपंच पोलीस पाटील व गावकरी उपस्थित होते. चौकशी दरम्यान गावातीलच विनोद माणकू टेकाम याने मसराम यांना मलाही गेल्या 4 वर्षापासून अन्नधान्य मिळाले नसल्याचे सांगितले.
गावक-यांनी रेशन दुकानदारांच्या बी 1 चे रजिस्टर चेक करण्याकरिता मागितले असता तहसील कार्यालयात असल्याचे दुकानदार यांनी सांगितले. ज्यामुळे रेशन दुकानदाराचे बी 1 रनिस्टर मध्ये काही घोळ असल्याचा संशय निर्माण झाला आहे. बी 1 रजिस्टर मध्ये नमूद असलेल्या कार्डधारकाना शासनाकडून मोफत आलेले तांदूळ देणे आवश्यक आहे परंतु कुपन मध्ये नाव असतांना सुद्धा अनेकांना शासनाचा मोफत तांदूळ वाटप होत नसल्याची ओरड आहे.