विवेक तोटेवार, वणी: 28 एप्रिल मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी तीन ठिकाणी धाड टाकून गोवंश कापून त्याचे मांस विक्री करणाऱ्या सात जणांना अटक केली आहे. मोमिनपुरा व रजानगर या परिसरात धाड टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. या सर्व विक्रेत्याकडून 1000 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे.
महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा असताना सुद्धा काही जण कायद्याची पायमल्ली करीत काही ठिकाणी गोवंश कापून त्याचे मांस विक्री करीत असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. माहितीवरून मंगळवारी सकाळी 28 एप्रिल रोजी ठाणेदार वैभव जाधव यांच्या आदेशावरून डीबी प्रमुख गोपाल जाधव हे आपल्या पोलोसांसोबत घटनास्थळाकडे रवाना झाले.
वणीतील मोमीनपुरा येथे सर्वप्रथम धाड टाकली. या ठिकाणी मोहम्मद अनिस अब्दुल रशीद कुरेशी (46), तौसिफ रईस कुरेशी (30), मोहम्मद नासिर अब्दुल रशीद (50), मोहम्मद एजाज अब्दुल अजीज कुरेशी (32), मोहम्मद कैसर अब्दुल अजीज कुरेशी (32) यांना अटक केली. हे सर्व जण गोवंशाची कत्तल करून त्याचे मांस विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यातच मांस विक्री हे घरातूनच करीत होते. घरामध्येच गोवंश कापल्या जात असल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले.
त्यानंतर डीबी पथकाने रजा नगरकडे मोर्चा वळविला. त्या ठिकाणी मोहम्मद इस्तेयाक अब्दुल वहाब (49) व तौसिफ ईस्तेयाक कुरेशी (19) यांना अटक केली. हे दोघेही घरातून मांस विक्री करताना आढळून आले. परिसरातील लोकांच्या म्हणण्यानुसार हा गैरप्रकार गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू आहे. परंतु याकडे कुणीही लक्ष देत नव्हते.
या सर्वांवर कलम 188, 269 भादवी, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976, कलम 5 (ब) (क), 9, 9, (अ) सहकलम 2,3 साथीचे रोग अधिनियम 1987 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोळीस निरीक्षक वैभव जाधव, डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, अमित पोयाम, शेखर वांढरे, पंकज उंबरकर, दीपक वाड्रसवार, अमोल अन्नरवार, संतोष आढव यांनी केली.