मुकुटबन येथील देशी दारू दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द
जिल्ह्यातील आणखी 4 बारचे परवाने रद्द
सुशील ओझा, झरी: अवैध दारूविक्री केल्या प्रकरणी मुकुटबन येथील देशी दारूच्या दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी जिल्ह्यातील चार परवाने रद्द केलेत त्यात पुसद येथील 2, यवमताळ येथील 1, मुकुटबन येथील 1 दारूच्या दुकानाचा समावेश आहे. या दुकानाचा परवाना एमएन नक्षिणे यांच्या नावावर आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 15 दारू दुकानाचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आली आहे.
मुकूटबन येथे 14 एप्रिलच्या रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान एका परवानाधारक देशी दारूच्या दुकानातून पेट्या काढत असताना एक महिला पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्या होत्या. पोलीस येताच त्यांनी दारूची पेटी सोडून पळ काढला होता. या प्रकऱणी दुकानाच्या मॅनेजरला अटक केली होती. हा माल काढताना अनेकांनी बघितले होते. या दुकानावर कार्यवाही करावी अशी मागणी सुरू होती. ‘वणी बहुगुणी’ने देखील हे प्रकऱण उचलून धरले होते. अखेर या प्रकरणी दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.