वणीतील वारंगणा वस्तीतील रहिवाशांवर उपासमारीची वेळ
आमच्याकडे कुणी लक्ष देणार का ? महिलांचा संतप्त सवाल
विवेक तोटेवार, वणी: वणीतील रेड लाईट एरिया म्हणून परिचित असलेल्या प्रेमनगरमध्ये वारांगना आपली देहविक्री करून पोटाची खळगी भरतात. सध्या कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या बिकट समयी कुणीही लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक संस्था यांच्याकडे मदतीसाठी फिरकले नसल्याची आपबिती या महिलांनी बोलताना सांगितली. जे कुणी व्यक्ती आलेत त्यांनी केवळ नाव लिहून परत गेले मात्र त्यांनीही मदतीच्या नावावर अतिशय तुटपुंजी मदत करून केवळ थट्टा केली असा आरोपही त्यांनी केला आहे.
प्रेमनगरमध्ये सुमारे 63 घरे आहेत. ज्यामध्ये सुमारे 250 ते 300 महिला व लहान मुले राहतात. कोरोनाच्या भीतीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून इथे कुणी ग्राहकही फिरकत माही. शिवाय कोरोनाच्या भीतीने इथल्या महिलांनी आपला व्यवसाय सुद्धा बंद केला आहे. त्या महिला त्यांच्या छोट्या मुला मुलीसोबत राहतात. गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण भारतात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद आहे.
या वस्तीत अनेक परिसरातील तसेच काही महिला परराज्यातून आलेल्या आहेत. काही महिला व्यवसायानिमित्त इथे आल्या व इथेच स्थायीक झाल्या आहेत. काहींचे मुलं मुलीही आता इथेच शिकतात. लॉकडाऊनआधी ग्राहक असल्याने त्यांचे घर सुरळीत सुरू होते. मात्र लॉकडाऊनंतर त्यांची संपूर्ण परिस्थिती बदलली. ग्राहक फिरकेनासा झाला. त्यामुळे त्यांना पैशाची चणचण भासू लागली. त्यातच जे साठवलेले पैसे होते. ते ही संपले. त्यामुळे आता जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
केवळ नाव लिहून त्यांची थट्टा…
या परिसरात अनेक लोक मदतीच्या नावावर आलेत. ते त्यांचे नाव लिहून गेले मात्र त्यांना हवी ती मदत काही शेवटपर्यंत मिळालीच नाही. काहींनी थोडीबहुत मदत केली पण ती तुतपुंजी होती. आज ही या महिला आशेवर आहेत की कुणीतरी त्यांच्यापर्यंत येईल आणि त्यांना मदत करेल. महत्त्वाचं म्हणजे या परिसरातील महिला कसे आयुष्य जगत आहेत याची साधी विचारपूस करायलाही कोणताही लोकप्रतिनिधी फिरकला नसल्याचा आरोप इथल्या महिला करीत आहेत
या एरियात काही लोक टिफिन पोहोचवण्याचे काम करीत आहेत. पण ती संख्या खूप कमी आहे. त्यामुळे एकाला जेवण तर चार लोक उपाशी अशी परिस्थिती आहे. वणी व परिसरात अनेक लोक धान्याचे वाटप करीत आहेत. मात्र या वस्तीकडे दानशुरांचे लक्ष काही गेले नाही. सोबतच इतर जीवनावश्य वस्तूूंचीही त्यांनाा गरज आहे. त्यामुळे इकडे कुणीतरी लक्ष देऊन लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी इथल्या महिलांनी केली आहे.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ….