विवेक तोटेवार, वणी: सोमवारी दुपारी वणी पोलिसांना दोन इसम दारूची अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे आढळले. या प्रकरणात पोलिसांनी 5760 रुपयांची दारू व दुचाकी असा 55 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रकऱणात वाहतुकीसाठी अल्पवयीन मुलाचा (विधीसंघर्ष बालक) वापर करण्यात आला. त्यामुळे आता तस्करीसाठी अल्पवयीन मुलाचा वापर करण्याची शक्कल तर लढवली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुपारी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना पोलीस विभागाला रासा येथे दारूची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती खब-याकडून मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार ठाणेदार वैभव जाधव यांनी डीबी पथकास घटनास्थळी रवाना केले. डीबी पथकाने वणीतून रासाकडे जाणा-या सतीघाट सोडवर सापळा रचला. काही वेळाने त्या रस्तावरून होन्डा शाईन (MH29 AB 8294) ही गाडी येताना दिसली. ती गाडी अल्पवयीन मुलगा (विधीसंघर्ष बालक) चालवत होता. त्याच्या मागे बसलेल्या इसमाजवळ 180 मीलीच्या 96 बॉटल आढळून आल्या.
पोलिसांनी लगेच कारवाई करत एक विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले तर दशरथ पंजाबराव मेश्राम (33) रा. रासा याला अटक केली. त्याच्याकडून 5760 रुपयांची दारू तसेच 50 हजारांची होन्डा शाईन गाडी असा एकून 55760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दशरथ मेश्रामवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम 65 (क) सह भादंविच्या कलम 269 व 270 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मागदर्शनात डीबी प्रमुख गोपाळ जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, सुदर्शन वनोळे, पंकज उंबरकर, दीपक वाडर्सवर, अमित पोयाम यांनी केली.
दारू तस्करीसाठी आता अल्पवयीन मुलांचा वापर?
या प्रकरणात आरोपी दशरथ मेश्रामने अल्पवयीन मुलाचा वापर केल्याचे आढळून आले. या मुलालाच त्याने गाडी चालवण्यास दिली होती. या मुलाकडे गाडी चालवण्याचा कोणताही परवान तसेच गाडीचे कोणतेही कागदपत्रेही आढळून आलेले नाही. विधीसंघर्ष बालक जर गुन्हेगारी कृत्यात आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सर्वसामान्य प्रक्रियेपेक्षा वेगळी आहे. नेमकं याचाच फायदा घेऊन आरोपीने विधीसंघर्ष बालकाचा वापर तर केला नाही, असा प्रश्न या निमित्ताने उभा होतोय. राज्यभरात याआधीही अनेक गुन्हेगारी कृत्यासाठी विधीसंघर्ष बालकाचा वापर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
वणी बहुगुणी आता टेलीग्रामवर. आपलं चॅनेल (@Wani Bahuguni) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि वणी व परिसरातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.