ब्राह्मणी फाटा व बसस्थानकाजवळ दारू तस्करांवर कारवाई
तिघांना अटक, 78 हजारांचा मुद्देमाल जप्त
विवेक तोटेवार, वणी: मंगळवारी दुपारी डीबी पथकाने दारू तस्करी करणा-या तिघांवर कारवाई करत तीन जणांना अटक केली. दोन वेगवेगळ्या करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपींकडून 78 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लॉकडाऊन असल्याने दारुतस्करी करणाऱ्यांनी नवीन शक्कल लढवीत बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात छुप्या मार्गाने दारू तस्करी करणे सुरू केले आहे. मंगळवारी दुपारी मिळालेल्या माहितीनुसार डीबी पथकाने ब्राह्मणी फाट्याजवळ दुचाकी क्रमांक MH 34 BQ 5026 ची तपासणी केली. तेथून नागराज रामस्वामी अंकम (35) रा. घुग्गुस व अनिल भानुदास बेलके (24) रा. घुग्गुस यांच्याकडून 5600 रुपयांची विदेशी दारू व वाहन असा 45680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वणी बसस्थानक जवळ केलेल्या कारवाईत सागर भाऊराव कुमरे (22) रा. माजरी कॉलरी यांच्याकडून वाहन क्रमांक MH 34 AT 6334 व विदेशी व देशी दारू असा एकूण 32630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर दोन्ही कारवाईत 78300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, दीपक वांडर्सवार, पंकज उंबरकर, अमित पोयाम, रत्नपाल मोहाडे यांनी केली.