शिबला येथील रेशन दुकानदाराविरोधात कार्ड धारकांची तिसरी तक्रार
थम्ब लावून परस्पर धान्याची उचल केल्याचा आरोप
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील आदिवासी गोरगरीब जनतेची दिशाभूल करून शासकीय धान्य उचल केल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करून कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कार्डधारकांची ही तिसरी तक्रार आहे. दोन तक्रारीवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी तिस-यांदा पुन्हा तक्रार केली आहे.
शिबला येथील मडावी व टेकाम यांच्या रेशन कार्डवरील माहे मार्च व एप्रिल २०२० चा धान्य रेशन दुकानदार याने स्वतःचा बोगस अंगठा (थम) लावून धान्य उचलल्याचे रेशन कार्ड धारकांनी सिद्ध करून वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पीडित व गावक-यानी तक्रार केली. परंतु अजूनही कोणतीही कार्यवाही केली नसल्याने माशी कुठे शिंकली हे कळायला मार्ग नाही.
रेशन दुकानदार यांने गावातील रेशनधारक लोकांना शासनाकडून मोफत मिळणारे तांदूळ उचल करून गावातील ५०% लोकांना वाटप केले नाही ज्यामुळे संताप व्यक्त होत आहे. रेशन कार्डधारकाचे तांदूळ दुकानदाराने डी १ रजिस्टर नुसार उचल केली परंतु कार्ड धारकांना ऑनलाइन मध्ये तुमचे नाव नसल्याचे सांगून तांदूळ वाटप न करता अर्ध्या गावाला तांदूळ पासून वंचित ठेवले व गरिबांचे तांदूळ स्वतः हडप केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
रेशन दुकानदारांनी डी १ रजिस्टर नुसार धान्य वाटप करण्याचे आदेश असतांना ऑनलाइन नावाच्या नोंदणी प्रमाणे तांदूळ वाटपाचे अधिकार या दुकानदाराला कुणी दिले. रेशन दुकानदाराने मडावी व माणकू टेकाम याचा कुपणवरील बोगस अंगठा लावून तांदुळाची उचल केली तसेच ५०% गावकऱ्यांना तांदूळ पासून वंचित ठेवले याबाबतची तक्रार यापूर्वी २४ व ३० एप्रिल २०२० ला जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना करूनही अजूनपर्यंत सदर दुकांदारावर एकही अधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही न करता त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शिबला ग्रामवासी करीत आहे.
रेशन दुकानदाराने अर्धे गाव ऑनलाइन केले नसून कार्डधारकाना ऑनलाईन करण्याचे काम कुणाचे असा प्रश्न गावातील जनता करीत आहे. एक कुटुंबातील ६ व्यक्तीला ३० किलो तांदूळ मिळणे आवश्यक असतांना २ वयक्तीचे नाव ऑनलाईन असल्याचे सांगून ४ वयक्तीचे २० किलो तांदूळ हडप करणे असे अनेकांचे क्विंटल तांदूळ हडपल्याचा आरोप आहे. रेशन दुकानाचा परवाना रद्द करून सदर दुकांदारावर त्वरित कठोर कार्यवाही करावी अशी मागणी आदिवासी बांधव वीरेंद्र दुधकोहळे, रविंद्र दडंजे छाया मेश्राम विनोद आत्राम,फुलाजी टेकाम यशवंत मडावी विठ्ठल उईके प्रदीप दुधकोहळे यांनी केली आहे.