Birthday ad 1

शेतपिकांच्या उत्पन्नात मधमाश्यांचा मोलाचा वाटा !

मानवाला जगण्यासाठी मधमाश्यांची होतेय अप्रत्यक्षपणे मदत

0
veda lounge

विलास ताजने, वणी:  ‘माय नेम इज खान’ या चित्रपटातील हिरो शाहरुख खानचा एक सिन तुम्हाला नक्कीच आठवत असेल. तो मधमाशांची काळजी घेतो. त्यावर त्या विचारण्यात येते की मधमाश्यांबद्दल इतकी आपुलकी का? तर सांगतो की ज्या दिवशी मधमाश्या नष्ट होणार त्या दिवशी पृथ्वी नष्ट होणार. याबाबत किती तथ्य आहे हे निश्चित सांगता येत नाही. मात्र अनेक संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन म्हणायचे की जर मधमाशा नष्ट झाल्यात तर आपण चार वर्षांपेक्षा अधिक काळ जगू ही शकणार नाही. यावरून आपल्या पृथ्वीवर मधमाशांचे किती महत्त्व आहे हे लक्षात येते. सध्या अमेरिकत एका गांधील माशी मधमाशांवर हल्ला करत असल्याने त्यांची संख्या कमी होत आहेत. त्यामुळे तिथे शास्त्रज्ञांनी या कोरोनाच्या काळातही या मधमाशांना वाचवण्यासाठी मोठी मोहिम उघडली आहे. त्यावरून मधमाशांची उपयुक्तता लक्षात येऊ शकते.

दुसरे कारण म्हणजे मधमाशी हा इतरांसाठी जगणारा कीटक म्हणूनही ओळखला जातो.  फळबागायती शेती असो किंवा नगदी पिकांची शेती यात पिकउत्पन्न वाढीस महत्त्वाचा वाटा असतो तो मधमाश्यांचा. मात्र माणसांच्या अज्ञानामुळे किंवा गैरसमजातून मधमाश्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. खरे पाहता मधमाश्या अन्ननिर्मिती करून मानवाला जगण्यासाठी अप्रत्यक्षपणे मदतच करत असतात. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे 20 मे हा दिवस ‘जागतिक मधमाशी दिन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

Jadhao Clinic

मानवी जीवनात निसर्गातील अनेक घटकांपैकी एक असणारे फुलपाखरू, पक्षी आणि मधमाशी यांच कार्य फार मोलाचं आहे. कृषिप्रधान देशात विविध प्रकारचे शेतपिकं, फळं, फुले, भाजीपाला यांच्या उत्पत्तिसाठी परागीकरण करणाऱ्या किटकांवर अवलंबून राहावं लागतं. कारण वनस्पतींच्या परागीकरणात फुलपाखरू, पक्षी, मधमाशा नकळतपणे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अनेक प्रकारच्या मित्र किटकांमुळे पीक उत्पन्नात वाढ होते. एवढं नव्हे तर असे उत्पादन आरोग्यासाठी पौष्टीकही असते. जेव्हा फळझाडांस फुले येतात तेव्हा मधमाश्यांद्वारा परागीकरण केले जाते. विशेष म्हणजे बहुतांश फळझाडांची फुले परागीकरण क्रियेने फलित झाल्यावर उत्तम फळे देतात. मात्र पिकांच्या कीडनियंत्रणासाठी कीडनाशकांचा होणारा अनिर्बंध वापर, प्रदूषण, कमी होत चाललेली वनसंपदा, तापमानवाढ आदी कारणांमुळे सद्यस्थितीत पशु, पक्षी आणि कीटकांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणावर घटत आहे.

विदर्भातील शेतशिवारात आग्यामाशी, सातेरा माशी, फुलोरा माशी अशा तीन प्रकारच्या मधमाशा प्रामुख्याने आढळतात. पूर्वी नैसर्गिकरित्या स्वरक्षणासाठी मधमाश्यांचे पोळ हे काटेरी किंवा उंच झाडांवर आढळून येत होती. परंतु दिवसेंदिवस कमी होणाऱ्या वनस्पतींच्या दाटीमुळे मधमाश्यांनी आपली जागा बदललेली दिसून येत आहेत. आता उंच इमारती, पूल, खुरटी झुडुपे किंवा कडुनिंब, चिंच आदी ठिकाणी पोळ आढळून येते. अनेकदा मध गोळा करताना मधमाशी डंक मारते. त्यामुळे मध काढण्यासाठी आग लावली जाते. किंवा शेणकुट पेटवून धूर सोडल्या जातो. त्यामुळे मधमाशा आंधळ्या होऊन मृत पावतात. मधमाश्यांची पाणी पिण्याची ठिकाणं तलाव, पाणवठे दुर्मिळ झाली आहे. त्यामुळे मधमाशा सिमेंटच्या बांधलेल्या टाक्यांवर पाणी पितात. परंतु पाण्यात पडल्यावर त्यातून निघता येत नाही. त्यामुळे मधमाशा मृत पावतात.

आयर्वेदात मधाच महत्त्व वर्णन केलेलं आहेत. औषधे बनविण्यासाठी मधाचा वापर केला जातो. नैसर्गिकरित्या मधात साखरेचं प्रमाण अधिक असते. शरीरातील विविध व्याधिवर रामबाण औषध म्हणून मधाचा उपयोग केला जातो. सौंदर्य फुलवण्यासाठी देखील मधाचा उपयोग केला जातो. दिवसेंदिवस कमी होणाऱ्या मधमाश्यांमुळे शुद्ध मध मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे बाजारात कृत्रिमरीत्या तयार केलेला मध विक्री केल्या जात आहे. परंतु असली मधापासून अधिक फायदा होतो. एकूणच मानवी जीवनात मधमाश्यांचे महत्त्व लक्षात घेता त्यांच संवर्धन करणे काळाची गरज आहे.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!