आमदारांच्या ‘महाराष्ट्र बचाव’च्या पोस्टवर ‘हाहा’कार

पोस्टवर 800 पेक्षा अधिकांची हाहा (?) रिऍक्शन

0

विवेक तोटेवार, वणी: कोरोना काळात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत महाराष्ट्र भाजपच्या वतीने काल शुक्रवारी राज्यभरात ‘महाराष्ट्र_बचाव’ हे आंदोलन करण्यात आलं. ‘आपलं अंगण, हेच रणांगण’ असं ब्रीदवाक्य घरातील अंगणात हे आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याबाबत भाजपचे, नेते, कार्यकर्ते व समर्थकांनी सोशल मीडियात पोस्ट टाकून या आंदोलनात मोठ्या संख्येन सहभागी व्हा असे आवाहन केले. तसेच आघाडी सरकारच्या निषेधाच्या पोस्ट देखील टाकण्यात आल्या. मात्र यातील अनेक पोस्टवर नेटक-यांकडून व महाविकास आघाडी समर्धकांकडून ‘हाहा’ म्हणजेच लॉफिंग (?) रिऍक्शन देण्यात आल्या. वणीतही असा प्रकार दिसून आला.

महाराष्ट्र बचाव आंदोलनात सहभागी होण्यासाठी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी गुरुवारी रात्री त्यांच्या फेसबूक अकाउंटवरून ‘चला निषेध करूया’ अशी आवाहनात्मक पोस्ट टाकली होती. मात्र त्यांच्या पोस्टवर नेटक-यांनी हाहा (?) रिऍक्शन देत त्याला प्रतिसाद दिला. या पोस्टवर सुमारे हजार रिऍक्शन आहेत. मात्र त्यातील सुमारे 900 रिऍक्शन या हसण्याच्या आहेत. यासह 1200 पेक्षा अधिक कमेन्ट या पोस्टवर करण्यात आल्या आहेत. यातील मोजक्या कमेन्टचा अपवाद वगळता या सर्व कमेन्ट आंदोलनच्या तसेच माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडवणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीका करणा-या व महाविकास आघाडी सरकारच्या समर्थनात आहे.

केवळ वणीतच नाही तर राज्यभरात भाजपच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनादरम्यानही हेच झालं. भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या फेसबुकवर पोस्टवर हजारोंच्या संख्येने ‘हाहा’ रिऍक्शन्स आले आहेत. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर, हर्षवर्धन पाटील, नितेश राणे, चित्रा वाघ यांच्या पोस्टवर एकूण लाईक्सपेक्षा हसणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पोस्टलाही हजारोंच्या संख्येने ‘हाहा’ रिऍक्शन्स आल्या आहेत.

हीच ती फेसबुक पोस्ट

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजप नेत्यांना अनोख्या पद्धतीने ट्रोल केलं जातंय. भाजप नेत्यांनी फेसबुकवर कसलीही पोस्ट टाकली की नेटिझन्स त्यावर ‘हाहा’ रिऍक्ट (हसण्याची प्रतिक्रिया) करत आहेत. त्यामुळे भाजपचे सर्वच नेते यामुळे त्रस्त आहेत. तर देवेन्द्र फडणवीस यांच्यासारख्या काही बड्या नेत्यांनी याबाबत तक्रारही केली होती. यावरून महाविकास आघाडी व भाजपच्या नेत्यांमध्ये सोशल मीडियातून चांगलीच जुंपली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे काम आधी भाजपने केले तेच आता त्यांच्यावर उलटले असून ‘पेराल तसे उगवेल’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.