सुशील ओझा, झरी: महसूल विभागाने जप्त केलेली रेती चोरीला गेल्याची घटना सुरदापूर येथे घडली आहे. सदर रेती शासकीय बांधकामासाठी वापरण्यात येणार होती. मात्र त्याआधीच रातोरात ही रेती चोरीला गेली. त्यामुळे ही रेती चोरून कुणी ‘माती’ खाल्ली याबाबत चर्चेला उधाण आले आहे. याबाबत तक्रार करण्यात आली असून आरोपींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे,
तालुक्यातील सुरदापुर येथे ग्रामपातळीवर तांडा वस्ती व इतर कामे सुरू आहे. त्याकरिता मोहदा व इतर ठिकाणावरून रेती व गिट्टीची वाहतूक सुरू असल्याची माहिती आहे. 25 मे रोजी नायब तहसीलदार गोल्हर पटवारी यांनी गावातील चार ब्रास रेती गावकऱ्यांसमोर जप्त करून पोलीस पाटलाकडे सुपूर्द नाम्यावर देण्यात आली. जप्त केलेल्या रेतीचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे दिला. यावरून तहसीलदार यांनी पंचायत समितीला पत्र देऊन सदर रेती शासनाच्या घरकुल बांधकाम करीता वापर करून ताब्यात घेण्याचे सांगितले.
गटविकास अधिकारी यांनी दुसऱ्या दिवशी काही कर्मचारी रेती आणण्याकरिता पाठविले असता तेथील चार ब्रास रेती रातोरात गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती सदर कर्मचाऱ्याने गटविकास अधिकारी सुधाकर जाधव यांनी पत्राद्वारे तहसीलदार यांना देऊन सदर ठिकाणी रेती नसल्याचे कळविले. चार ब्रास रेती सुपूर्द नाम्यावर दिल्यानंतर रेतीची देखरेख का करण्यात आली नाही ?
गेली रेती कुणीकडे?
जप्त केलेली रेती एका राजकीय पक्षाशी निगडीत ठेकेदाराने रोडच्या कामात वापरल्याची कुजबुज गावक-यांमध्ये आहे. याआधीही सदर राजकीय ठेकेदाराने असे अनेकदा जप्तीची रेती गायब करून स्वतःच्या कामाकरिता वापरल्याची ओरड गावकरी करत आहेत. आपल्या पदाचा दुरुपयोग करून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून ठेकेदारी करीत असल्याचेही बोलले जात आहे.
ठेकेदारीकरिता रेती, गिट्टीची अवैद्य वाहतूक केल्या जात आहे असल्याची ओरड असताना अधिकारी याकडे दुर्लक्ष का करीत आहे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सुरदापुर येथीलच रमेश सनसनवार यांनी सुद्धा ७ ब्रास जप्त केलेली रेती गायब झाल्याची तक्रार तहसीलदार यांच्याकडे केली असून चोरी गेलेल्या रेती प्रकरणाची चौकशी करून सदर चोरट्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे.