बालाजी जिनिंग आग प्रकरण: 1600 क्विंटल कापूस जळाल्याची तक्रार
जळाल्याचा आकडा चौपट दाखवून घोटाळा दडपण्याचा प्रयत्न ?
सुशील ओझा, झरी: मंगळवारी मुकुटबन येथील बालाजी जिनिंगमध्ये सीसीआयने खरेदी केलेला शेकडो क्विंटल कापूस आग लागून खाक झाल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे या आगीमध्ये खासगी खरेदी केलेल्या कापसाचे बोन्डसुद्धा जळाले नाही. त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. कापूस खरेदीत घोटाळा दडपण्यासाठी बालाजी जिनिंगमध्ये जाणूनबुजून सीसीआयने खरेदी केलेला हलक्या दर्जाचे कापूस जाळण्यात आल्याचा आरोप होत असताना आता 200-400 क्विंटल कापूस जळाला असताना 1600 क्विंटल कापूस जळाल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे चौकशीचे आदेश देताच कापूस जळाल्याने या प्रकरणाला आणखीनच रंग चढला आहे.
कापूस हंगाम 2019-20 मध्ये सीसीआयच्या कापूस खरेदीत बाजार समित्या, जिनिंग मालक व सीसीआय अधिकाऱ्यांच्या संगनमताने वणी विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याबाबत ‘वणी बहुगुणी’ने सतत बातम्यांची मालिका प्रकाशित केली होती. जिल्ह्यात सीसीआयच्या कापूस खरेदीमध्ये “मार्जिन” व “सेटिंग” बाबतही खुलासा केला होता.
कापूस घोटाळ्याची वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश
हमी भावात कापूस खरेदीत करोडों रुपयांचा घोटाळ्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याचे आदेश सीसीआय व्यवस्थापकीय संचालक पी. के. अग्रवाल यांनी दिल्यानंतर जिनिंग मालक व ग्रेडर्सचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार दडपण्यासाठी कापूस गंजीत जाणुनबुजून आग लावली जात आहे. जिनिंग कारखान्यामध्ये फायर फायटर सुविधा आवश्यक असताना आगीच्या घटनेवेळी जिनिंगमधील फायर फायटर बंद अवस्थेत असते. तसेच बालाजी जिनिंग मधील कापसाच्या गंजीच्या आजूबाजूला किंवा वरून इलेक्ट्रिक वायर नसताना शॉर्टसर्किटचा विषयच उत्पन्न होत नाही.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पोटावर लात ठेवून गब्बर झाले आहे. बालाजी जिनिग मधील कापूस गंजीत लागलेल्या आगीची प्रत्ययदर्शी पाहणी केली असता ९०% टक्के कापूस चांगला असून कापूस गंजीवरील फक्त ६ इंच वरील थर जळाला असून संपूर्ण कापूस चांगला आहे. जळालेल्या कापूसपैकी ८० टक्के कापूस मजूर महिलांनी साफ करून गंजी मारली असून उर्वरित जळलेला कापूस महिला साफ करीत आहे.
1600 क्विंटल कापूस जळाल्याची तक्रारीने आश्चर्य
कापूस गंजी वरील थर जळल्याने हजारो क्विंटल कापूस खराब झाल्याचे दिसले. परंतु 200 ते 400 क्विंटलच्या वर कापूस जळाला नाही. परंतु पोलीस स्टेशनला 1 हजार 600 क्विंटल कापूस जळल्याची खोटी तक्रार देण्यात आली आहे. यावरून कापूस खरेदीत झालेले भ्रष्टाचार दडपण्याकरिता कापूस जाळक्याची ओरड शेतकरी करीत आहे.
सदर कापूस जळल्याप्रकरनी वरीष्ठ स्तरावरून चौकशी करून जिनिंग मालक व त्यांना सहकार्य करणाऱ्या सीसीआयच्या ग्रेडर्स विरुद्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.