धक्कादायक… पेरलेले बियाणे उगवलेच नाही !
शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात, 'कोरोनात' तेरावा महिना....
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कुर्ली या गावातील जवळपास 40 शेतकऱ्यांनी संकल्प कंपनीचे बियाणे घेतले. परंतु 4 दिवस लोटूनही बियाणे उगवलेच नाही व ते जमिनीतच सडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार केवळ कुर्ली गावातील शेतक-यांसोबतच नाही तर नवरगाव, कायर येथील शेतक-यांसोबतचही हाच प्रकार झाल्याचे समोर आले आहे.
कुर्ली येथील शेतकऱ्यांनी शिंदोला येथील नितीन कृषी केंद्र व कल्याण कृषी केंद्र येथून वसंत ऍग्रोटेक प्रा. लि. संजीवनी संकल्प अकोला या कंपनीचे सोयाबीनचे बियाणे घेतले. 13 जून रोजी अनेकांनी पेरणी केली परंतु सदर बियाणे उगवलेच नाही. खोदून पाहिले असता ते बियाणे सडल्याचे त्यांना निदर्शनास आहे. याबाबत तिथल्या शेतक-यांनी माहिती काढली असता सुमारे 40 शेतक-यांसोबत हा प्रकार झाल्याचे समोर आले. महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतक-यांनी इतर कंपनीचे बियाणे घेतले ते मात्र उगवले.
सदर बियाणे हे शेतक-यांनी उधारीवर घेतले होते. मात्र बियाणे न उगवल्याने आता त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. मात्र पुन्हा बियाणे उधार देणार नाही अशी भूमिका कृषी केंद्र संचालकांनी घेतल्याने आता करावं तरी काय या पेचप्रसंगात शेतकरी अडकला आहे. कोरोनाच्या काळात शेतक-यांना कोणत्याही सवलती मिळाल्या नाहीत. त्यातच आता बियाणे न उगवल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. याबाबत तक्रार तालुका कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी तक्रारही केली आहे.
नवरगाव, कायरसह इतर गावातील शेतक-यांसोबतही हाच प्रकार
हाच प्रकार केवळ कुर्ली गावातील शेतक-यांसोबतच नाही ज्या शेतक-यांनी संकल्प कंपनीचे बियाणे घेतले त्या सर्वच शेतक-यांसोबत झाल्याचे समोर आले आहे. तर ज्या शेतक-यांनी इतर कंपनीचे बियाणे घेतले ते मात्र उगवले आहे. आज गुरुवारी याबाबत अनेक शेतक-यांनी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत शेतक-यांनी तालुका कृषी अधिका-यांशी चर्चा केली असता त्यांनी दोन ते चार दिवसानंतर प्रत्येकाच्या शेताची पाहणी होईल. त्यानंतर कदाचित त्यांच्या खात्यावर मदत टाकली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र मदत मिळेलच याची काहीच शास्वती नाही. त्यातच 4 चे 8 दिवस काय करावे? पुन्हा कर्ज काढून दुबार पेरणी करावी की सरकारी मदतीची वाट बघावी अशा द्विधा मनस्थितीत बळीराजा अडकला आहे.