स्वातंत्र्य दिनानिमित्य समता सैनिक दलाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
मार्च आणि लेझिम पथकानं वेधलं सर्वांचं लक्ष
वणी: 15 ऑगस्ट मंगळवारी दु. 2.00 वा.समता सैनिक दल वणी तर्फे स्वातंत्रता दिन अभिवादन मार्च काढून राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. हा मार्च सम्राटअशोक नगरपासून सुरू झाला. पुढे हा मार्च बुध्द विहार मार्गानं टागोर चौकातून डॉ. आंबेडकर चौकात थांबला. यावेळी स्वातंत्रदिन, भारतीय लोकशाही आणि संविधानाचा जयघोष करीत राष्ट्रगीत गाऊन, बाबासाहेबांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी छोट्या भीमसैनिकांचं लेझीम पथक सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं.
मानवंदना दिल्यानंतर मार्च बुद्धविहार, सम्राट अशोक नगर येथे पोहोचला. विहाराच्या प्रांगणात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेली ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्याते म्हणुन मार्शल विवेक बक्शी, तर अध्यक्ष म्हणून मार्शल सुनील सारीपुत्र उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मार्शल धनश्री तेलंग यांनी केले.
व्याख्यानानंतर समुहगीत घेण्यात आले. स्वतेजा मस्के व संचाने समुहगीता द्वारे बाबासाहेबांचं देशासाठी कार्य विशद केलं. विलास नरांजे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी समृध्द तेलंग, चिकाटे,चंदन, ऍड भगत, अजय भगत, सह अनेक समता सैनिकांनी परिश्रम घेतले.