नागेश रायपुरे, मारेगाव: वणीत शहरात कोरोनाने एन्ट्री केल्याने जवळच असलेल्या मारेगाव तालुक्याने त्याची चांगलीच धास्ती घेतली आहे. सध्या मारेगाववासी दहशतीत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मारेगाव येथील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सोबत येऊन “कोव्हीड 19 दक्षता ग्रुप” हा गृप तयार केला आहे. या गृपद्वारा मारेगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून बैठक घेण्यात आली.
या गृपमध्ये ग्रामीण पत्रकार संघटनेचे पत्रकार, राजकीय क्षेत्राशी जुळलेले लोक, सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती यांचा समावेश आहे. कोरोनाबाबत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी यासाठी तहसील कार्यालयात दक्षता ग्रुपच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासकीय अधिका-यांसह गृपचे व्यक्ती व शहरातील प्रतिष्ठीत नागरिक सहभागी झाले होते.
तहसीलदार दीपक पुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत मारेगावात कोरोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबत चर्चा करण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना देठे यांनी वैद्यकीय खबरदारीबाबत मार्गदर्शन केले. ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी शासनाच्या गाईडलाईनबाबत माहिती दिली. यांच्यासह मुख्याधिकारी नीलेश गायकवाड पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी पांडे यांनीही याबाबत सूचना केल्यात.
परत गेलेला मास्क पुन्हा तोंडाला
वणीत कोरोनाचे 6 रुग्ण सापडताच मारेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. अनेक दिवसांपासून तोंडावरून गायब झालेला मास्क पुन्हा लोकांच्या तोंडावर आला आहे. मार्केटमध्ये गर्दी कमी झालेली दिसत आहे. भाजीपालाही नागरिक दुरूनच खरेदी करत आहे. काही दिवसांपासून गायब झालेले सॅनिटायजर अचानक अनेक दुकानात दिसू लागले आहे. कुणी बाहेर निघाल्यास रुमाल, स्कार्फ व मास्क बांधूनच बाहेर पडत आहे.