नियम धाब्यावर बसवून पार्टी देणा-यांवर गुन्हे दाखल करा
सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी, प्रशासनाला निवेदन सादर
जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यातच पॉजिटिव्ह निघालेला रुग्ण पार्टीमध्ये असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे वणीकरांमध्ये दहशत निर्माण झाली. दरम्यानच्या काळात नियम धाब्यावर बसवून एक नाही तर अनेक पार्टी आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे वणीकरांचा जीव टांगणीला आहे. त्यामुळे अशा पार्टीची सखोल माहिती काढून नियम धाब्यावर बसवणा-या व्यक्तींवर तसेच ज्या व्यक्तींनी कोविड 19 संबंधी लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी वणीतील राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. याबाबत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.
एका आठवड्याआधी वणीत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. दरम्यानच्या काळात वणीमध्ये अनेक पार्टीचे आयोजन करण्यात आले. आता या पार्टीमध्ये कोरोना बाधित सापडला असल्याने दरम्यानच्या काळात झालेल्या सर्व पार्टीची माहिती काढून नियमांचा भंग करणा-या आयोजकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. यासह दरम्यानच्या काळात झालेल्या सर्व पार्टीत सहभागी झालेल्या व्यक्तींची माहिती काढून त्यांना तात्काळ विलगीकरण कक्षात दाखल करावे, तसेच सीसीटीव्हीची मदत घेऊन बाधित कोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आले याची माहिती काढावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
राज्यभरात 30 जूनपर्यंत लॉकडाऊऩ जाहीर करण्यात आले आहे. यात काही व्यवसाय, सेवा यांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सध्या लग्न यासाठी 50 व्यक्तींची तर अंत्यविधीसाठी 20 लोकांची परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही सामुहीक कार्याला परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच वणीमध्ये संध्याकाळी 5 नंतर कोणताही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात बंदी असताना परिसरात अनेक जागी पार्टी झाली. एका प्रतिष्ठीत व्यक्तींनी तर याची जाहीर कबुली दिली असतानाही प्रशासन कारवाई का करत नाही असा प्रश्न निवेदन देणा-यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी अनिल घाटे, अजय धोबे, दिलीप भोयर, अनिल हेपट, ॲड. अमोल टोंगे, रुपेश ठाकरे, असीम हुसेन, संदीप गोहोकार, अनिकेत चामाटे, दत्ता डोहे, नितीन तुरणकर, सागर जाधव, गौरव तातकोंडवार इत्यादी उपस्थित होते.