नुकसानग्रस्त शेतक-याला मोबदला देण्यास प्रशासनाची टाळाटाळ
शेतातून रस्ता गेल्यानं शेतक-याचं झालं होतं नुकसान
रवी ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील भुरकी येथील शेतक-याच्या शेतातून गेलेल्या रस्त्यामुळे झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याची तक्रार शेतक-यानं दिली आहे. या गंभीर प्रश्नाकडे उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष पुरवून न्याय देण्याची अपेक्षा संबधीत शेतक-यानं व्यक्त केली आहे.
सविस्तर वृत्त असं की वणी तालुक्यातील भुरकी येथील शेतकरी साईनाथ रामाजी सोनटक्के यांच्या 2 हेक्टर शेताला लागूनच रांगणा ते भूरकी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. रस्त्याचे बांधकाम करीत असताना संबधित विभागानं पाणी वाहून जाण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. परिणामी मागील वर्षी पावसाचं पाणी साचून साईनाथ सोनटक्के यांच्या शेतातील संपूर्ण शेतमाल पाण्याखाली आला. त्यामुळे त्यांच्या शेतातील शेतमालाचं पूर्णतः नुकसान झाले होते.
यासंबधी सोनटक्के यांनी तहसिलदार वणी यांचेकडे ऑक्टोबर 2016 मध्ये तक्रार करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यावरून तहसिलदार वणी यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला तलाठी यांनी दिलेल्या अहवालावरून नुकसान भरपाई देण्यासंबधीचे पत्र दिले होते. मात्र सदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्याचं जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कळविले होते. त्यानंतर सदर प्रस्ताव धूळखातच ठेवण्यात आला.
यानंतर जवळपास दहा महिण्यांचा कालावधी लोटून गेला तरीसुध्दा संबधित शेतक-याला नुकसान भरपाई मिळाली नाही. वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत नुकसान भरपाई न मिळाल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागणार असल्याची प्रतिक्रीया संबधीत शेतक-यानं दिली आहे. आधीच शेतीत उत्पन्न होत नसल्यानं त्यातच प्रशासनाच्या चुकीमुळे शेतीचं नुकसान झालं असल्यानं या प्रश्नाकडे उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालून नुकसानग्रस्त शेतक-याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करत आहे.