वणीत भाव कडाडले… भाज्यांचे भाव गगणाला !

वाईन शॉपवर बम्परमागे 100 ते 200 रुपयांची लूट

0

विवेक तोटेवार, वणी: आधीच कोरोनाच्या दहशतीत असलेल्या वणीकरांची सकाळ आज महागाई घेऊन उगवली. वणीत ‘जनता कर्फ्यू’ लागू होणार असल्याचे जाहीर होताच त्याचा तात्काळ प्रभाव शहरात दिसून आला. लोकांनी सकाळीच भाजी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली. त्यामुळे भाजी मार्केट गजबजून गेले होते. मार्केटमध्ये काल भाजीचे जे भाव होते त्यापेक्षा दीड ते दुप्पट भाव आज वाढवण्यात आले. कोरोनामुळे आधीच आर्थिक चणचणीत असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला या कृत्रिम महागाईमुळे चांगलीच चोट बसत आहे.

सोमवारपासून वणीमध्ये पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात येणार आहे. दरम्यान 5 दिवस संपूर्ण मार्केट बंद राहणार आहे. तर कृ़षी केंद्र, मेडिकल आणि दूध डेअरी केवळ ठरावीक वेळेत सुरू राहणार आहे. त्यामुळे जनता कर्फ्यू लागू होण्याच्या आधीच आवश्यक ती खरेदी करून ठेवा असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे लोकांनी सकाळपासूनच भाजी मार्केटमध्ये गर्दी करायला सुरू केली.

भाजीचे भाव गगणाला भिडले
काल 40 रुपये किलो असलेली भेंडी आज 60 रुपये किलो दराने विकली केली. फुलकोबी 60 रुपये किलोची 100 रुपये किलो दराने विक्री झाली. टमाटर 30 रुपये किलोचे 80 किलो. चवळी शेंगा 40 रुपये किलोचे आजचे दर 80 रुपये. पालक जुडी 40 रु. ची 80 रुपये. सांभार 20 रु.चा आजचा दर 40 पाव, मिरची 10 रुपये पावची 30 रुपये पाव. कांदे 20-30 रुपये किलो असलेला आजचा दर 40-50 रुपये किलो. पत्ताकोबी 60 रु किलोची 100 रुपये किलो, लसून 100 रुपये किलोचा आजचा दर 140 रुपये किलो. अदरक 80 रुपये 120 रुपये किलो. वांगे 40 रुपये किलोचे 60 रुपये किलो.

वाईनशॉपवर ग्राहकांची लूट
जनता कर्फ्यू मध्ये गळा कोरडा पडू नये म्हणून वणीकरांनी सकाळी सकाळी स्टॉक करण्यावर सर्व लक्ष केंद्रीत केले. मात्र वाईन शॉपमध्ये भाव वाढवल्याचे कळताच ढगाळ वातावरणातही ग्राहकांना चांगलाच घाम फुटला. बम्परमागे 100 ते 200 रुपये दर वाढवल्याने मद्यप्रेमींच्या खिशाला चांगलीच चोट बसत आहे. गेल्या 5-6 दिवसांपासून वणीतील एकच वाईनशॉप सुरू असल्याने तेव्हापासून ही लूट सुरू असल्याची माहिती ग्राहकांनी दिली आहे. कॉर्टर, पॉइंट, बम्पर या सर्वामागेच रेट वाढवण्यात आले आहे. शासनाचे प्रिंट रेटपेक्षा अधिक दरारे विक्री न करण्याचे स्पष्ट आदेश असताना गेल्या काही दिवसांपासून वणीत वाईन शॉपवर ग्राहकांची लूट सुरु आहे.  या प्रकाराबाबत मद्यप्रेमींमध्ये प्रचंड संताप असून अशा वेळी प्रशासन काय करीत आहे असा सवालही उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावरही या लूटबाबत चांगलीच चर्चा रंगत आहे.

शासकीय मैदानावर शुकशुकाट
वणीत कोरोनाचा रुग्ण सापडताच त्याची चांगलीच धास्ती ग्राउंडवर फिरणा-या आणि व्यायामाला जाणा-या लोकांनी घेतली आहे. ग्राउंडवरची संख्या ही दिवसेदिवस कमी झाली. मात्र काल सेवा नगरमध्ये नवीन रुग्ण सापडल्यानंतर आज लोकांनी ग्राउंडवर जाणे टाळले. त्यामुळे केवळ बोटावर मोजता येईल इतकेच लोक ग्राउंडवर दिसून आले.

शासकीय मैदानावर शुकशुकाट

आधीच कोरोनामुळे वणीकर दहशतीत आहे. सर्वसामान्य तसेच व्यवसायिकांना लॉकडाऊनचा चांगलाच फटका बसला आहे. त्यातच काही व्यवसाय अद्यापही बंदच आहे. लोकांची आर्थिक घडी संपूर्ण विस्कटली आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढतानाच आता महागाईच्या संसर्गालाही तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाशी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे असताना भाववाढ करून खिशे भरण्याचा प्रकार सध्या  सुरू आहे. हा प्रकार मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा असून  प्रशासनाने सर्वसामान्यांची होणारी लूट तात्काळ थांबवावी अशी अपेक्षा वणीकर जनता व्यक्त करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.