वणी: वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या कायर येथे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावले असल्याची तक्रार करीत, महिलांनी शिरपूर पोलीस ठाण्यात धडक दिली. यासंबंधी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिका-यांना निवेदन देत कायर परिसरात चालणारे अवैध व्यवसाय त्वरीत बंद करावेत अशी मागणी केली आहे.
कायर येथील अवैधरित्या सुरू असलेली दारूविक्री त्वरित बंद करावी ही मागणी घेऊन येथील महिला सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेकडो महिलांनी शिरपूर ठाण्यावर धडक दिली आणि ठाणेदारांकडे तक्रार केली. यासोबतच वणी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय गाठून त्यांनाही निवेदन सादर केले आहे. कायर येथील अवैध व्यवसाय त्वरित बंद न झाल्यास आंदोलन उभारणार असल्याचा इशारा सुध्दा महिलांनी दिला आहे.
(मुकुटबन येथील दारू अड्यावर पोलिसांची धाड)
वणी तालुक्यातील आठवडी बाजारपेठ असलेल्या कायर गावात शासनानं महामार्गालगत असलेली दारूची दुकाने बंद केली. तेव्हापासून गावात अवैध दारूविक्रीला मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. परिसरात राजरोसपणे दारूविक्री होत आहे. मात्र प्रशासनानं त्यांना जणू अभय दिल्यासारखे ते वावरत असून या अवैध दारूविक्रीमुळे कित्येक कुटुंब, उघड्यावर आले आहे. असा आरोप करत अखेर गावातील महिलांनी पोलीस ठाण्याला धडक देण्याचा निर्णय घेतला. आता शिरपूर पोलीस स्टेशन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.