कुसुमाग्रज म्हणालेत, ही तर स्वरचंद्रिका…

आज पद्मश्री पद्मजा फेणाणी यांचा जन्मदिन

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: इंदिरा संत यांना जनस्थान पुरस्कार जाहीर झाला. त्या सोहळ्यात त्यांच्या कविता स्वरबद्ध करून गायची जबाबदारी पद्मजा फेणाणी यांच्याकडे आली. त्यांनी त्यांच्या कविता गायल्यात. संपूर्ण उपस्थित रसिक त्यांच्या सादरीकरणाने मंत्रमुग्ध झालेत. नंतरच्या काळात कुसुमाग्रजांनी पद्मजा फेणाणी यांचा ‘रंग बावरा श्रावण’ हा अल्बमही ऐकला. अत्यंत खूश होऊन कुसुमाग्रजांनी पद्मजा फेणाणींबद्दल गौरवोद्गार काढलेत. ते म्हणाले, ही तर स्वरचंद्रिकाच. लहान असताना एकमेव येत असलेल्या ‘नैनो मे बदरा छाये’ या गीतापासून तर पद्मश्री पुरस्कारापर्यंत त्यांची सांगितिक कारकीर्द थक्क करणारी अशीच आहे.

मुंबईला शंकरराव फेणाणी आपल्या परिवारासहीत राहत. शंकरराव हे उत्तम चित्रकार तथा जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्चे गोल्ड मेडॅलिस्ट. त्यांची मोठी मुलगी उषादेखील तिथूनच गोल्ड मेडॅलिस्ट होती. संगीतात या परिवाराला रुची होती. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब,, उस्ताद अमीर खान साहेब, पंडित पलुस्कर यांच्या जुन्या तबकड्या अर्थात रेकॉर्डस नेहमी सुरूच असायच्या. त्यात मोठी बहीण उषाताई गायची. त्यामुळे बालपणापासूनच पद्मजांवर संगिताचे संस्कार झालेत. बहिणीच्या पाठोपाठ त्या गायच्या.

त्यांच्या शेजारीच शंकररावांचे मित्र उस्ताद हलीम जाफर खान साहेब राहायचे. रोज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी ते यांना उठवायला यायचे. एक दिवस छोटीशी पद्मजा काहीतरी गुणगुणत होती. तेवढ्यात खान साहेब तिथे पोहचलेत. त्यांनी तिचा आवाज ऐकला. त्यावर ते शंकररावांना म्हणालेत, ‘‘अल्लाहने इस बेटी को लाखो-करोडों में अच्छी आवाज बक्षी है’.

याही पुढे जाऊन ते म्हणालेत, छोट्या पद्मजाला शास्त्रीय संगीताचे योग्य शिक्षण द्या. आणि त्यानंतर गुरूंचा शोध सुरू झाला. शंकररावांचा संगीतक्षेत्रात संपर्क होता. तरीदेखील पद्मजाचं वय खूप कमी पडत असल्याने त्यांना कोणी इतक्या कमी वयात संगीत शिकवायला तयार होत नव्हतं.

दुर्गा ही पद्मजाची मैत्रीण. तिच्या वडलांची रेडिओ कॉन्सर्ट होती. दुर्गा, तिचे वडील आणि पद्मजा टॅक्सीने रेडिओ स्टेशनकडे निघाले. जाताना गाडीत दुर्गा काहीतरी गुणगुणायला लागली. तिचं पाहून पद्मजादेखील गुणगुणायला लागली. यांचं गुणगुणनं दुर्गाचे वडील ऐकत होते. ‘क्या तुम क्लासिकल सिखती हो?’ असा सवाल दुर्गाच्या वडलांनी पद्मजाला केला. त्यावर पद्मजा ‘नाही’ उत्तरली. .

दुर्गाच्या वडलांना ती खोटं बोलत आहे असं वाटलं. कारण दुर्गाचे वडील कुणी साधेसुधे व्यक्ती नव्हते, तर ते होते साक्षात पंडित जसराज. आपल्या मैत्रिणीचे वडील एवढे मोठे संगीततज्ज्ञ आहेत, याची छोट्याशा पद्माला मुळीच कल्पना नव्हती. पंडित जसराज यांनी तिच्यातले गुण हेरलेत. लगेच 1980मध्ये गंडाबंधन झालं. पद्मजाचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण पंडित जसराज यांच्याकडे सुरू झालं.

शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगितातली पद्मजाची पकड अधिकाधिक मजबूत व्हायला लागली. देशभरातील विविध सांगीतिक स्पर्धांमध्ये तिने प्रथम बक्षीस मिळवलं. तिने वडलांना थेट सांगितलं, आता फक्त संगीतातच कार्य करेन. शिक्षण बंद करायचं आहे. वडलांनी सांगितली की, आधी डिग्री पूर्ण कर. मग पूर्ण आयुष्यभर संगीतच आहे. त्यानंतर पद्माजाने मायक्रोबॉयलॉजीत डिग्री मिळवली. संगीताचा प्रवास आता पूर्ण तन्मयतेने आणि समर्पित होऊन सुरू झाला.

पंडित जसराज सोबत पंडित रामनारायण आणि पंडित हृदयनाथ त्यांना गुरूरूपात मिळालेत. अमेरिकेत पत्रकारांनी एकदा लता मंगेशकर यांना प्रश्न विचारला. तुमच्या नंतर संगीतक्षेत्रात कुणाकडून आशा करता येईल? त्यावर लतादिदींनी पद्मजा फेणाणी यांचं नाव घेतलं. ज्या काळात लतादिदींना भारतरत्न पुरस्कार मिळाला त्याच काळात 2001मध्ये पद्मजा फेणाणी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

त्यानंतर त्यांच्यावर जणू पुरस्कारांची बरसातच झाली. बीग एफ एम मराठी म्युझिक अवॉर्ड फॉर बेस्ट सिंगर, माणिक वर्मा पुरस्कार, मिया तानसेन अवार्ड, भारत निर्माण अवार्ड, एस. डी. बर्मन अवार्ड अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. आपला संगीताचा वारसा पुढील पिढीला देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्यांच्या जगण्यात शिस्त आणि निटनेटकेपणा आहे. तोच त्यांच्या संगीतात आणि शिष्यांमध्ये उतरवण्याचा त्या प्रयत्न करतात.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे हळव्या मनाचे आणि संवेदनशील कवी. त्यांचा ‘मेरी 51 कविताए’ हा संग्रह कुणीतरी पद्मजा फेणाणी यांना भेट दिला. त्यांनी त्यातील काही कवितांना स्वरबद्ध केलं. 9 ऑगस्ट 1997 रोजी रामटेकला त्यांची अटलजींसोबत प्रत्यक्ष भेट झाली. कुणीतरी सांगितलं की, पद्मजा तुमच्या कविता गातात. अटलजींना पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. ते म्हणाले, ‘‘माझ्या कविता कुणी गाऊच शकत नाही. कारण मी त्या मुक्तछंदात लिहिल्यात.’

नंतर पद्मजा फेणाणी यांनी त्यांच्यासमोर त्यांच्याच कविता गायला सुरूवात केली. गायन झाल्यावर अटलजी उभे राहिले. टाळ्या वाजवल्यात. मोठ्या मनाने म्हणालेत, ‘ह्या टाळ्या माझ्या कवितेसाठी नसून, तुमच्या स्वरांसाठी आहेत.’ ही खूप मोठी दाद होती पद्मजा फेणाणी यांच्यासाठी. त्यांनी संगीताला संपूर्णपणे वाहून घेतलं. रसिकांच्या हृदयात त्यांचे स्वर अजूनही स्थान करून आहेत. त्यांच्या जन्मदिवसाला आणि सांगीतिक कारकीर्दीला सदिच्छा.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.