वणीत कोरोनाचा नवीन रुग्ण, रुग्णांचा आकडा 10

नागपूरला जाऊन टेस्ट करून परत, दुस-या दिवशी पॉजिटिव्ह

0

जब्बार चीनी, वणी: वणीत आज दिनांक 8 जुलै रोजी कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता वणीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 10 झाली. विशेष म्हणजे ही नवीन साखळी आहे. याआधीच पहिली साखळी खंडीत झाली होती. तर दुस-या साखळीतील रिपोर्ट अद्याप आलेले नसताना आता तिसरी साखळी तयार झाली. त्यामुळे वणीकरांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे सदर व्यक्ती काल परवाच नागपूरला जाऊन टेस्ट करून वणीत परत आली. आज त्यांना पॉजिटिव्ह असल्याची माहिती मिळाली. सदर व्यक्ती राहत असलेले घर सिल करण्यात आले असून हा संपूर्ण परिसर सिल करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. नवीन रुग्णाविषयी प्रशासनाने अद्याप अधिकृतरित्या जाहीर केले नसले तरी रुग्णाबाबतची सर्व प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्ती ही व्यावसायिक आहे. व्यवसायाच्या कामानिमित्त ती व्यक्ती दिनांक 26 जून रोजी यवतमाळ येथे कामानिमित्त गेली होती. त्यांचा एक व्यवसाय पांढरकवडा येथे ही आहे. दोन दिवसांनी त्यांनी पांढरकवडा येथे ही भेट दिली होती. दरम्यान त्यांना सर्दी आणि ताप आला. 1 जुलै रोजी ती व्यक्ती वणीतील एका खासगी डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. मात्र त्यांच्यात कोरोनासदृष्य लक्षणं दिसत असल्याने त्यांनी नागपूरला जाऊन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला.

नागपूरला जाऊन टेस्ट करून परत
एक आठवडा ताप न उतरल्याने तसेच कोरोना सदृष्य लक्षणं आढळल्याने त्यांनी नागपूर गाठले. तिथे त्यांनी एका खासगी रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली. स्वॅब दिल्यानंतर ते परत वणीला आले. त्याचा आज रिपोर्ट आला व त्यात ती व्यक्ती पॉजिटिव्ह असल्याचे आढळून आले. रिपोर्ट पॉजिटिव्ह येताच याची माहिती स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आली. त्यांनी पुढल्या कार्याला सुरूवात केली. सध्या साईनगरी हा परिसर सिल करण्यात आला असून पॉजिटिव्हचे कुटुंबीय तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ट्रेस करण्याचे कार्य सुरू आहे.

आढावा घेताना प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी

वणीत सध्या चाललंय काय?

कोरोनाच्या कोरोनाची तिसरी साखळी सुरू झाली आहे. दुसरी आणि तिसरी साखळी कशी सुरू झाली हे  अद्याप निश्चित कळू शकलेले नाही.  दुसरी विशेष बाब म्हणजे प्रत्येक साखळीतील स्रोतने दिशाभूल करून व खोटे कारण देऊन आंतरजिल्हा प्रवास करत नागपूरला जाऊन कोरोनाची चाचणी केली आहे. आंतरजिल्हा प्रवासासाठी काही नियम आणि अटी आहेत. ई पास काढताना कोरोना सदृष्य लक्षणं आहे का याची विचारणा केली जाते. मात्र प्रशासनाची दिशाभूल करून व माहिती लपवून राजरोसपणे नागपूरला जाऊन लोक कोरोनाची टेस्ट करत आहेत. प्रशासनाने तीन दिवसात ताप उतरला नाही तर त्याची माहिती देण्याचे वेळोवेळी आवाहन केले आहे. मात्र आठवडा होऊनही संशयीत याची माहिती प्रशासनास देत नाहीये. तिसरी व्यक्ती तर टेस्ट करून परतही आली. हलगर्जीपणाची हद्द गाठल्याने वणीत सध्या चाललंय काय? असे म्हणण्याची वेळ आली आहे.

पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करणार?
आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार विना परवानगी किंवा माहिती दडवून व दिशाभूल करून आंतरजिल्हा प्रवास करणे गुन्हा आहे. विना परवानगी नागपूरला जाऊन टेस्ट करणा-यांची संख्या ही अधिक असू शकते. जो पर्यंत प्रशासन याविरोधात कठोर कारवाई करत नाही. तो पर्यंत हा बेजाबदारपणा व या हलगर्जीपणाला लगाम लागणार नाही. त्यामुळे आता पोलीस प्रशासनासह आपत्ती निवारण प्रशासनानेही कठोर होणे गरजेचे आहे. अऩ्यथा रुग्ण वाढण्यास वेळ लागणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.