86 वर्षांची आजी व दीड वर्षाच्या नातीची कोरोनावर मात

दुस-या साखळीतील 42 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, वणीकरांना आणखी एक दिलासा

0

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनाक 8 जुलै रोजी वणीत कोरोनाचा एक रुग्ण सापडल्याने चिंता वाढली असतानाच वणीतील यवतमाळ येथे उपचार घेत असलेल्या आजी व नातीने कोरोनावर मात केल्याच्या गोड बातमीने वणीकरांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. सध्या कोरोनावर मात करणा-या 86 वर्षांची आजी व त्यांची दीड वर्षांची नात यांना सुटी मिळाली असून त्या सध्या वणीमध्ये खबरदारी म्हणून होम कॉरन्टाईन आहे. तर याच परिवारातील आणखी 3 व्यक्ती या देखील निगेटिव्ह आल्याने हे संपूर्ण कुटुंबच कोरोनामुक्त झाले आहे. आता पहिल्या साखळीतील केवळ दोनच व्यक्तींवर उपचार सुरू आहे. ते देखील लवकरच कोरोनावर मात करून परत येईल अशी आशा आहे. दुस-या साखळीतील 42 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने वणीकरांना आणखी एक दिलासा मिळाला आहे. दरम्यान प्रशासनाने संशयीतांनी घाबरून टेस्टसाठी नागपूरला जाऊ नका असे आवाहन केले आहे.

दिनांक 20 जूनला वणीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होता. त्याच्या 21 जूनला त्याच कुटुंबातील तिसरी व्यक्ती व 24 जूनला या कुटुंबातील दोन व्यक्ती म्हणजेच आजी आणि नात यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. यातील तीन व्यक्तींवर नागपूर येथे तर आजी आणि नातीवर यवतमाळ येथे उपचार सुरू होता. या सर्वांनी अवघ्या दोन आठवड्यांच्या आतच कोरोनावर मात केली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

तीन व्यक्तींना 5 जुलै रोजी नागपूर येथील आयसोलेशन (अलगीकरण कक्ष) सेन्टरमधून तर आजी आणि नातीला 7 जुलै रोजी यवतमाळ येथील आयसोलेशन सेन्टरमधून सुट्टी देण्यात आली आहे. नागपूर येथे बरे झालेले नागपूरला त्यांच्या फ्लॅटवर तर आजी आणि नात या वणी येथील घरी कॉरन्टाईन आहेत. या संपूर्ण कुटुंबानेच कोरोनावर मात केली असून आता फक्त त्यांच्या संपर्कातील दोन व्यक्ती उपचार घेत आहे. त्यांचीही प्रकृती चांगली असून त्यांना ही लवकरच सुट्टी मिळू शकते अशी प्रतिक्रिया मात केलेल्या कुटुंबीयांतर्फे देण्यात आली.

प्रातिनिधिक फोटो

घाबरू नका व नागपूरला जाऊ नका: डॉ. शरद जावळे
आजी आणि नातीने कोरोनावर मात केली ही खूप आशादायी गोष्ट आहे. लहान मुलं आणि वृद्धांसाठी कोरोना धोकादायक असल्याचे बोलले जाते मात्र आपल्या वणीतील आजी आणि नातींने कोरोनावर सहज मात करता येऊ शकते हे दाखवून दिले आहे. कोरोना वेळीच निष्पन्न झाल्याने आज संपूर्ण कुटुंबाला त्यावर मात करता आली. त्यामुळे वणीकरांनी न घाबरता कुणाला जर तीन दिवस ताप असेल तर त्याची माहिती लगेच प्रशासनाला द्यावी. तसेच कुणीही माहिती लपवू नये व तपासणीसाठी नागपूरला जाऊ नये. वेळीच निदान होऊन जर उपचार मिळाले तर कोरोनावर सहज मात करता येऊ शकते.
– डॉ. शरद जावळे, उपविभागीय अधिकारी, वणी

दुस-या साखळीतील 42 रिपोर्ट निगेटिव्ह
या गोड बातमीसह आज वणीकरांना आणखी एक दिलासादायक देणारी बातमी मिळाली. दुस-या साखळीतील 49 व्यक्तींचे स्वॅब पाठवण्यात आले होते. त्यातील 42 व्यक्तींचे स्वॅब हे निगेटिव्ह आले आहेत. यात पॉजिटिव्ह असलेल्या व्यक्तींचे कुटुंबीय, तपासणारे डॉक्टर तसेच कर्मचारी यांचा समावेश आहे. दरम्यान आज वणीत आणखी एक रुग्ण सापडल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना कॉरन्टाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब उद्या पाठवण्यात येणार आहे.

सध्या वणीतील 10 पैकी 5 रुग्णांनी कोरोनावर मात करू आता केवळ 5 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान प्रशासनाने कोरोनाबाबत खबरदारी घेत मास्क बांधण्याचे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे व वेळोवेळी हात स्वच्छ करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच नागपूर येथे तपासणीसाठी न जाता सलग तीन दिवस ताप असल्यास प्रशासनाला याची माहिती द्यावी असे आवाहन केले आहे.

हे पण वाचा: वणीत  बुधवारी सापडला आणखी एक रुग्ण… 

वणीत कोरोनाचा नवीन रुग्ण, रुग्णांचा आकडा 10

Leave A Reply

Your email address will not be published.