शेतक-यांची कृषी पंप जोडणीची समस्या तात्काळ सोडवा
खा. बाळू धानोरकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
जब्बार चीनी, वणी: जिल्ह्यातील शेतकरी आधीच अडचणीत आहे. त्यामुळे शेतक-यांना त्रास होता कामा नये. कृषी पंपाना तात्काळ वीज पुरवठा करा. ग्राहकांच्या वीज बिला संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे वेऴीच निवारण करा असे निर्देश खा. धानोरकर यांनी अधिका-यांना दिले. वणीमध्ये बुधवारी 8 जुलै रोजी शासकीय विश्राम गृहात वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत खासदारांची कृषी पंप जोडणी विषयावर आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांचा आढावा घेऊन अधिका-यांना योग्य ते निर्देश दिले.
लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घरगुती विद्युत मीटरचे बिल देण्यात आले नव्हते. त्यामुळे ग्राहकांना तीन महिन्याचे एकत्रीत बिल देण्यात आले. एकाच वेळी तीन महिन्यांचे बिल आल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले. तसेच बिल अधिक आल्याची ओरडही नागरिक करीत आहे. या समस्येकडेही खासदारांनी लक्ष वेधले.
गेल्या दोन वर्षापासून नवीन वीज जोडणी करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना सोलर वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र सोलरपासून निर्मित होणाऱ्या विजेने कृषी पम्प चालत नाही. शेतकऱ्यांची फसगत होत आहे. पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोलर बसविण्यास भाग पाडू नये. त्यांना वीज जोडणी करून द्या तसेच ज्या शेतकऱ्यांनी सोलर करिता अनामत भरली असेल ती त्यांना परत करा असे ही निर्देश खा. बाळू धानोरकरांनी अधिकार-यांना दिले.
तसेच शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींचे 48 तासात निराकरण करणे गरजेचे असताना त्यांना बरेच दिवस वाट पहावी लागते या कडे लक्ष वेधून तात्काळ त्यांच्या तक्रारीं निकाली काढा अशा देखील सूचना केल्यात.
उपविभागात 5600 ट्रान्सफार्मर बसवण्यात आले आहे. मात्र यातील एखाद्या ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्यास दुसरे ट्रान्सफार्मर बसविण्याकरिता वीज वितरण कंपनीकडे ट्रान्सफार्मरच उपलब्ध नसल्याचेही यावेळी उघड झाले. शेतकरी व सर्वसामान्यांच्या विजेबाबत असलेल्या समस्यांकडे योग्य ती उत्तरं नसल्याने त्यांनी नोकरी म्हणून नाही तर आपली नैतिक जबाबदारी म्हणून काम करा असे ठणकावून सांगितले.
या बैठकीत कार्यकारी अभियंता मंगेश वैद्य, उप कार्यकारी अभियंता विनोद मानकर, विलास चेले, रवींद्र खोंडे, राहुल पावडे, सहाय्यक अभियंता एम ए शेख उपस्थित होते.