सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांडवी येथील रहिवासी असलेले सभापती राजेश्वर गोंड्रावार व शिवसैनिक राकेश गालेवार यांच्यात वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना शनिवारी घडली. याबाबत दोन्ही बाजुंनी पाटण पोलीस ठाण्यात परस्पर तक्रार देण्यात आली आहे. हे प्रकरण घडल्याची माहिती मिळताच पोलीस ठाण्यात शिवसेना व भाजपचे नेते पोहचले होते. या घटनेमुळे झरी तालुक्यात भाजप व शिवसेना वाद रंगणार असल्याची चिन्ह दिसत आहे.
गोंड्रावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी दिनांक 25 जुलै रोजी संध्याकाळी सभापती राजेश्वर गोंड्रावार घरी परत येत होते. दरम्यान गावातील तलाठी कार्यालय जवळ त्यांची सरपंचाशी भेट झाली. तिथे ते दोघे चर्चा करीत होते. चर्चे दरम्यान राकेश गालेवार तिथे आले. तिथे गालेवार व गोंड्रावार यांच्यात वाद सुरू झाला. संपूर्ण मांडवी गाव भ्रष्टाचार करून खाऊन टाकले म्हणत गालेवार यांनी वाद सुरू केला.
वाद सुरू असताना गालेवार यांनी अश्लिल शिवीगाळ करून शर्टाचे कॉलर पकडली व मारहाण करण्यास सुरवात केली. गोंड्रावार यांनी विरोध करताच गालेवार यांचे वडील, मोठे वडील व मोठे भाऊ आले व त्यांनी सुद्धा मारहाण करून शिवीगाळ केली. असा आरोप गोंड्रावार यांनी करत या प्रकरणी गालेवार विरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून राकेश गालेवार सह तीन जणांवर कलम २९४, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दुस-या तक्रारीनुसार सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी गावातील काही बांधकामाचे काम घेतले होते. ते काम निकृष्ट दर्जाचे होते. त्याबाबत गालेवार यांनी गोंड्रावार यांची गटविकास अधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. त्याचा वचपा गोंड्रावार आणि सरपंच जेव्हा चर्चा करत होते तेव्हा गोंड्रवार यांनी माझ्याबाबत तक्रार करण्याची तुझी हिम्मत कशी झाली असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली असा आरोप गालेवार यांनी करत त्यांनी गोंड्रावार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. गोंड्रावारवर कलम ५०४ ,५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारामारीला प्रशासकपदाची पार्श्वभूमी?
ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर गेल्याने शासनाने ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या पदावर प्रशासक म्हणून आपलाच माणूस बसावे याकरिता सर्वच पक्षानी मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे अनेक गावात एकमेकांना बदनाम करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. एकमेकांविरोधात तक्रारी केल्याचा त्यांच्या गटाची व्यक्ती प्रशासकपदी येणार नाही यासाठी असे प्रकार होत असल्याची चर्चा तालुक्यातील राजकीय वर्तुळात रंगत आहे.
सदर घटनेचा प्रकरणाचा तपास ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अभिवमान आडे व संदीप सोयाम करीत आहे.