जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वणी तालुक्यात दिवसागणित वाढतच चालला आहे. प्रशासनातर्फे कोरोनाला आळा घालण्यासाठीचे सर्वतोपरी प्रतिबंधात्मक उपाय योजले जात असतानाही वणीत कोरोना रुग्णांचा झपाट्यानं वाढणारा आकडा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. आता पर्यंत एका दिवशी कोरोनाचे 2-3 रुग्ण पॉजिटीव्ह असल्याचा रेकार्ड मोडून गुरुवारी तब्बल 10 कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण वणी शहर व लगतच्या चिखलगाव येथे आढळून आले. त्यामुळे यापुढे वणीतही पांढरकवडा सारखा कोरोना उद्रेक होईल की काय ? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शहरवासीयांना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मात्र वणी शहरातील नागरिकांच्या मनात कोरोनाची दहशत संपली की काय ? बाजाराच्या वेळी होणाऱ्या गर्दीसह सकाळी व सायंकाळच्या वेळी नांदेपेरा मार्गावर विना मास्क व झुंडमध्ये हजारोंच्या संख्येने वृद्ध, महिला, तरुण, तरुणी व लहान मुलं मुलीसुद्दा मॉर्निंग वॉक व शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडत आहे. नांदेपेरा मार्गावरील शहरालगत असलेले खुल्या लेआउट मध्ये सायंकाळी 5.00 ते रात्री 12 वाजेपर्यंत मद्यशौकीन तसेच पार्ट्या करणा-या युवकांचा गोतावळा असतो.
विशेष म्हणजे शहरातील अनेक अल्पवयीन मुलं सुद्दा या खुल्या ले आउट मध्ये सिगारेट व अमली पदार्थांचे झुरके घेत मद्यपान करताना दिसत आहे. नांदेपेरा मार्गावरील काही दुकानातून रात्री उशिरापर्यंत छुप्या मार्गाने पाणी बॉटल, प्लॅस्टिक ग्लास, गुटखा, सिगारेट, चिप्स, बिस्किटची विक्री सुरू असते. त्यामुळे या मार्गावर सायंकाळनंतर रहदारीत अनपेक्षित वाढ झाली आहे.
राज्यात लॉकडाउन लागू झाल्यानंतर मे महिन्यापर्यंत शहरात पोलीस, महसूल व नगर परिषदचे फिरते पथक दिवसभर शहरातील मुख्य रस्त्यासह गल्ली मोहल्यात गस्त घालत होते. त्यामुळे दंडाच्या भीतीपोटी अकारण घराबाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी होती. मात्र आता वाहतूक पोलिसांचे वाहन वगळता शहरातील एकही रस्स्यावर फिरते पथक वाहन गस्तीवर दिसत नाही. कोरोना प्रतिबंधक समितीचे अधिकारी व संबंधित विभागाचा एकमेकांशी ताळमेळ नसल्याची बाबही समोर आली आहे.
तेली फैलात कोण बेजबाबदार?
तेली फैलात पहिला रुग्ण हा 10 जुलै रोजी आढळून आला. त्यानंतर त्याच्या दुस-या दिवशी येथील काही परिसर प्रतिबंधित केला. त्यानंतर जसजसे रुग्ण वाढत आहेत तसतसे प्रतिबंधीत क्षेत्रही वाढत जात आहे. गेल्या 20 दिवसांपासून हा परिसर प्रतिबंधित आहे. मात्र तरीही येथील कोरोना एका कुटंबापासून दुस-या कुटुंबापर्यंत जाताना दिसत आहे. त्यामुळे बाहेरून जरी क्षेत्र प्रतिबंधित असले तरी आत मात्र मुक्त वावर तर नसतो असा संशय व्यक्त केला जात आहे.
कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना परसोडा येथील कोविड सेंटर मध्ये क्वारंटीन करण्यात येत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पर्यायी कोविड केंद्र सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतले आहे. मात्र मागील चार दिवसांपासून योग्य इमारतीचे शोध सुरू असल्याचे सांगण्यात येते. कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी तालुका प्रशासनाने लवकरच कडक पाऊलं न उचलल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.