जब्बार चीनी, वणी: कोविडबाबत ट्रिटमेन्ट कुठे घ्यायची हे ठरवणे रुग्णांचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रशासनाने परवानगी दिल्यास वणीत सर्व सोयीसुविधा असणारं एक भव्य कोविड केअर रुग्णालय उभारू. प्रशासनाने खासगी रुग्णालयांना कोविड केअर सेन्टर उभारण्याची तसेच खासगी हॉटेलला कॉरन्टाईन सेन्टर करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी डॉ. महेंद्र लोढा यांनी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करत प्रशासनाने परवानगी दिल्यास परिसरातील नागरिकांना कोरोनाच्या काळात अधिक योग्य त्या सोयी सुविधा मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी प्रसासनाची भेट घेत खासगी कोविड केअर सेन्टरबाबत मागणी केली आहे.
सध्या वणी शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तसेच प्रशासनाचे ट्रेसिंग कार्य अतिशय उत्तम पणे सुरू आहे. त्यानंतर त्यातील हाय रिस्क व व्यवस्था नसणा-या व्यक्तींना परसोडा येथील कोविड केअर सेन्टरमध्ये कॉरन्टाईन केले जाते. तर व्यवस्था असणा-या व लो रिस्क असणा-या रुग्णांना होम कॉरन्टाईन केले जाते. शिवाय जिल्हाधिकारी यांच्या नवीन आदेशानुसार विशेष लक्षणं नसणा-या रुग्णांनाही याच कोविड केअर सेन्टरमध्ये उपचार करण्यात येत आहे. यातील अनेकांची खासगी ठिकाणी कॉरन्टाईन किंवा खासगी दवाखान्यात उपचार घेण्याची इच्छा असेत. अशा व्यक्तींसाठी खासगी हॉटेल तसेच खासगी दवाखान्यात उपचार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी डॉ. महेंद्र लोढा यांनी केली आहे.
वणी परिसरातील सर्वात मोठे कोविड रुग्णालय उभारू – डॉ. लोढा
वणी वैद्यकीय सेवेच्या बाबतीत अत्यंत प्रगत आहे. सर्व प्रकारचे स्पेशालिस्ट डॉक्टर आणि मल्टिस्पेशालिटी सेवा वणीत उपलब्ध आहे. तसेच कोविड रुग्णासाठी असलेली सेपरेट टॉयलेट बाथरून, टीव्ही, वायफाय, सकस आहार या सा-या सुविधा त्यांना आम्ही देऊ शकतो. वणीत जर खासगी कोविड केअर रुग्णालय झाले तर रुग्णांना उच्च दर्जाच्या सेवा मिळेल व त्याचा रुग्णांचाच फायदा होईल. प्रशासन जो दर ठरवेल त्या दरात आम्ही कोविड रुग्णांची सेवा करण्यास तयार आहोत. याबाबत आम्ही प्रशासनाकडे डॉक्टर असोसिएशनतर्फे मागणी केली आहे. जर परवानगी दिल्यास केल्यास यवतमाळ जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरेल असा पॅटर्न आम्ही देऊ शकतो.
– डॉ. महेंद्र लोढा, डॉक्टर असोसिएशन वणी
कॉरन्टाईन करण्यासाठी खासगी हॉटेलची मदत घ्या
गेल्या काही दिवसांपूर्वी कॉरन्टाईन करण्यासाठी खासगी हॉटेलची मदत घ्यावी अशी मागणी वणीतील काही सुज्ञ नागरिकांद्वारे करण्यात आली होती. सध्या कोरोनामुळे वणीतील अत्याधुनिक सेवा सुविधा पुरवणारे लॉजिंग हॉटेल रिकामेच आहे. ज्या व्यक्तींना पेड कॉरन्टाईनची सेवा घ्यायची असेल त्यांच्यासाठी पेड कॉरन्टाईनची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.
सध्या प्रशासनाने जिल्हाबंदी केल्याने रुग्णाला जिल्ह्यातच कोरोनाबाबत वैद्यकीय सेवा घ्यावी लागते. अनेक रुग्णांची खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करण्याची ऐपत असली तरी रुग्णांना बाहेर जिल्ह्यात जाण्यास बंदी असल्याने नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचार घेण्याऐवजी प्रशासनाने जिथे व्यवस्था केली तिथे उपचार घ्यावा लागतो.
वणीत अनेक रुग्ण प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून नागपूर येथे खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेऊन बरे झाले आहेत. शिवाय अनेक नेते आणि मंत्र्यांनी मुंबईत जाऊन कोरोनाबाबत उपचार केला आहे. जर मंत्री आणि नेते बाहेर जाऊन खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकतात तर वणी आणि परिसरातील लोक वणीतच खासगी रुग्णालयात उपचार का घेऊ शकत नाही? असा युक्तीवादही केला जात आहे.
वणीत खासगी कोविड केअर रुग्णालय झाले तर…
वणीत सध्या सर्व स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. शिवाय कोविड रुग्णांना जी अत्यावश्यक सेवा पाहिजे त्या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा वणीतील खासगी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात उपलब्ध आहेत. याशिवाय सध्या पांढरकवडाही कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. जर वणीत खासगी कोविड केअर रुग्णालयाची परवानगी मिळाली तर त्याचा केवळ वणी मारेगाव आणि झरी तालुक्यातील नाही तर पांढरकवडा येथील रुग्णांनाही फायदा होऊ शकतो. असा दावा डॉक्टर असोसिएशनतर्फे करण्यात येत आहे. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी यांची देखील भेट घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.