सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: जांबुवंतराव धोटे येरवड्याच्या जेलमधे बंद होते. जेल मधून त्यांना पॅरोलवर सुटी मिळाली. एक गाडी आली. त्या गाडीत त्यांना बसवण्यात आलं. त्यांची आई नागपूरला भरती असल्याचं सांगण्यात आलं. ती गाडी अत्यंत वेगानं मुंबई विमानतळावर आले. विमानाने ते लगेच नागपूरला पोहचले. विमानतळावरून दवाखान्यात जाण्यासाठी गाडी तयार होती. ते दवाखान्यात पोहचले.
आईच्या शेजारी सेवासुश्रूषा करीत असतानाच त्यांना दिसले कट्टर राजकीय वैरी वसंतराव नाईक. तुरुंगात बंद असलेल्या जांबुवंतराव धोटे यांची आई आजारी होती. ही बातमी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना कळली. त्यांनीच धोटे यांना नागपूरपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था केली.
राजकीय मतभेदांच्या पलीकडे असलेला माणुसकीचा जिवंत झरा जांबुवंतराव धोटे यांनी अनुभवला. ते हे सगळं पाहून भारावले होते. भांबावले होते. वसंतराव नाईक यांनी अनेकांच्या मनाच्या उजाड वाळवंटात सकारत्मकतेचा ‘वसंत’ फुलवला. म्हणूनच ते सर्वांचे ‘नाईक’, म्हणजे नायक झालेत. १८ ऑगस्ट हा त्यांचा स्मृतिदिन.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात बंजारा समाजातील चतुरसिंग राठोड यांनी गहुली हे गाव वसवलं. ते तांड्याचे प्रमुख होते. नायक होते, म्हणून त्यांना ‘नाईक’ ही उपाधी मिळाली. त्यांना दोन मुलं होती. मोठा राजूसिंग आणि धाकटा हाजूसिंग. हाजूसिंग सर्वांचा लाडका. त्यांना छोटे बाबा म्हणत. १ जुलै हा वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषिदिन म्हणून सर्वत्र करतात.
हेच हाजूसिंग पुढे वसंतराव नाईक म्हणून नावारूपास आलेत. छोट्या हाजूसिंगला शिक्षणाची प्रचंड ओढ होती. नागपूर, अमरावतीसह अनेक ठिकाणी त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. अगदी प्राथमिक अवस्थेतदेखील त्यांनी 3-3 किलोमीटर पायी प्रवास करून आपलं शिक्षण सुरूच ठेवलं.
बरं यातही पहिली पोहरा येथे, दुसरी उमरी येथे, तिसरी बान्सी येथे आणि चौथी भोजला येथे झाली. नागपूर येथील नील सिटी हायस्कूलमधून ते मॅट्रिक झालेत. 1937 ला बी.ए. झाल्यावर त्यांनी 1940 ला ‘लॉ’ केलं. वकिलीची पदवी मिळाल्यावर सर्वात आधी ते डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या संपर्कात आलेत. त्यांच्याच मार्गदर्शनात 1941 ला त्यांनी वकिली सुरू केली. गोरगरीब, अडल्या-नडल्यांना त्यांच्या वकिलीतून ते मदतदेखील करायचे.
कॉलेज लाईफमधे असताना वसंतराव नाईक यांच्यावर महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांचं वाचनही खूप अफाट होतं. त्यांची पावलं आता समाजकार्याकडे वळलीत. डॉ. पंजाबराव देशमुख यांचाही त्यांच्यावर बराच प्रत्यक्ष प्रभाव होता. त्यामुळे वसंतरावांच्या सामाजिक चळवळीला एक दिशा मिळत होती.
याच दरम्यान 16 जुलै 1941 ला त्यांचं वत्सला घाटे यांच्यासोबत लग्न झालं. कॉलेजमधे जुळलेली मनं लग्नाच्या बेडीत बांधली गेलीत. वत्सलाबाई या ब्राह्मण परिवारातल्या होत्या. वसंतराव हे बंजारा परिवारातले होते. त्यामुळे हा आंतरजातीय विवाह बराच गाजला. त्यामुळे त्यांना बराच रोषदेखील पत्करावा लागला.
त्यांना निरंजन आणि अविनाश ही मुलं झालीत.आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यातली हीदेखील एक क्रांतीच होती. त्यांच्यातला स्पार्क हा ठळकपणे उठून दिसत होता. त्यात 1943 ला त्यांना पुसद कृषी मंडळाचं अध्यक्ष करण्यात आलं. त्यांच्या कार्याच्या कक्षा रुंदावत गेल्या.
1946 मधे त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. इथूनच त्यांच्या वादळी राजकीय कादकीर्दीला सुरुवात झाली. ते पुसद हरिजन मोफत वसतिगृह आणि दिग्रस राष्ट्रीय मोफत छात्रालयाचे अध्यक्षही राहिलेत. 1946लाच ते पुसद नगर पालिकेचे नगराध्यक्षही झालेत. 1951 ला विदर्भ प्रदेश समितीच्या कार्यकारिणी सदस्यपदी त्यांची निवडही झाली. दरम्यान ते मध्यप्रदेश सहकारी बँकेचे संचालकदेखील होते.
1952च्या निवडणुतीत ते विजियी झालेत. मध्यप्रदेश विधानसभेवर यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले. ते महसूल उपमंत्री झालेत. 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषक मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात ते सहकार, कृषी, दुग्धव्यवसाय खात्याचे मंत्री झाले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना महसूल खातं देण्यात आलं.
यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर मारोतराव कन्नमवार मुख्यमंत्री झालेत. त्यांचं निधन झाल्यावर वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. 1963 ते 1975 अषी त्यांची एका तपाची म्हणजेच 12 वर्षांची गाजलेली कारकीर्द राहिली. 12 मार्च 1977 ला वाशीम मतदार संघातून ते खासदारदेखील झालेत.
भारत-पाक युद्धातून देश सावरला होता. तोच 1966 ला महाराष्ट्र अवर्षणात होरपळला. अन्नाच्या दुष्काळाची झळा सोसत होता. खचलेल्या शेतकऱ्यांना हिंमत द्यायला वसंतरावांनी दुष्काळग्रस्त भागात जातीनं जाऊन पाहणी केली. 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966 या काळात लाल बहादूर शास्त्री लाल बहाद्दूशास्त्री तेव्हा प्रधानमंत्री होते.
अन्नधान्याचा खूप मोठा तुटवडा होता. नागरिकांचे अन्नावाचून प्रचंड हाल होत होते. ‘‘जय जवान-जय किसान’’चा नाराही त्यांनी लावला होता. संपूर्ण देशच अन्नाच्या संकटात सापडला होता. तेव्हा अमेरिकेहून धान्य आयात करणं सुरू झालं. मात्र तेही अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं. महाराष्ट्राची धुरा त्यावेळेस वसंतराव नाईकांच्या हातात होती.
त्यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली. ‘‘जर दोन वर्षांत महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला नाही, तर मला फाशी द्या’’ असं म्हणणं म्हणजे वसंतरावांचं धाडसच होतं. त्यांनी अत्यंत ताकदीने आपला शब्द पूर्ण केला. महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढलं. त्यांनी हायब्रिड बियाणं उपलब्ध करून दिलं.
अनेकदा तर ते स्वतः शेतात जाऊन प्रात्यक्षिकही करून दाखवत. ते मुळातच शेतकरी होते. भूमिपूत्र होते. 7 जुलै 1972 नाशिक जिल्ह्यातील मखलाबाद येथे शेतकऱ्यांसाठी शिबिर झालं. त्यात ते म्हणाले की, शेती मोडली तर देश मोडेल. शेती मोडली तर लोकशाही मोडेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेती मोडता कामा नये.
शेतकऱ्यांना सर्वांगाने समृद्ध करण्यासाठी त्यांनी कापूस एकाधिकार योजना आणली. पशूपालन या शेतीपूरक व्यवसायाला नवीन दिशा दिली. तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब सावंत यांच्या सहकार्याने संकरित गाईंची खरेदी केली. दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून दिले. महाराष्ट्रातील धवलक्रांतीचा आरंभ वसंतरावांनी केला. पशूपालन आणि कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी क्रांतिकारी उपाययोजनांची अंमलबजावणी केली.
वसंतराव स्वतः शेतकरी कुटुंबातून ते आले होते. त्यामुळे त्यांना त्यातील सर्व बारकावे, अडीअडचणी माहीत होत्या. त्यांना यातील शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची आणि संशोधनांची प्रामुख्याने निकड भासू लागली. यातूनच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मराठवाडा कृषी विद्यापीठ, कोकण कृषी विद्यापीठ उभारण्यात आले. शेतीत विविध संशोधनांना वेग आला. ही कृषिक्रांतीची सुरुवात होती.
पाणी हा शेतीतला सर्वात महत्वाचा फॅक्टर. यावर त्यांनी भविष्यातही उपयोगात येतील असं भरीव काम केलं. ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ हा महामंत्रावर त्यांनी नागरिकांना केंद्रित केलं. त्यांच्याच नियोजनातून उजनी, जायकवाडी, चासकमान, पेंच, अप्पर वर्धा, धोम ही धरणं बांधली गेलीत. पाझर तलाव, वसंत बंधारा ही वसंतरावांचीच देण आहे.
महाराष्ट्राची विद्युतशक्तीही वाढली ती वसंतरावांच्या देदिप्यमान कामगिरीमुळेच. पारस, कोराडी, खापरखेडा, भुसावळचे औष्णिक विद्युत प्रकल्प त्यांनी सुरू केलेत. महाराष्ट्र पाणी आणि विजेने समृद्ध झाला. दुष्काळी भागांत नव्या विहिरींचे व तळ्यांचे खोदकाम त्यांनी सुरू केलं. अपूर्ण रस्ते पूर्ण करण्यावर भर दिला. शेतमालासाठी गोदामं बांधलीत. सहकारी जिनिंग प्रेसिंग उद्योगाला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या कार्याची एक प्रचंड मोठी यादी आहे.
एक मोठं आव्हान म्हणूनच 1972चा दुष्काळ आला. लोकांना रोजगारही मिळत नव्हते. वि. स. पागे यांनी एक संकल्पना मांडली. त्यावर प्रत्यक्षात काम सुरू झालं. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातही हे पहिल्यांदाच होत होतं. या योजनेअंतर्गत जलसंधारणाची कामं खूप मोठ्या प्रमाणात झालीत.
ही योजना एवढी प्रभावी ठरली की केंद्राने ही योजना स्वीकारली. महात्मा गांधी यांच्या नावाने मनरेगा ही योजना कार्यान्वित झाली. 1967 सालच्या कोयना भूकंपाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा दिला. त्यांच्या पुनर्वसनाचं कार्य वसंतरावांनी केलं. अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांना ते धाडसाने तोंड देत राहिले. त्यांचं निवारण करत राहिले.
लोकशाहीच्या विकेंद्रिकरणाचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात पंचायत राजची मुहूर्तमेढ त्यांच्याच कारकीर्दीत झाली. वसंतराव या समितीचे अध्यक्ष होते. यात त्यांनी अनेक शिफारसींसह भरीव योगदान केले. केवळ 16 महिन्यांत सखोल अभ्यास करून 293 पानांचा ‘नाईक अहवाल’ त्यांनी सादर केला.
त्यानुसारच आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं कार्य सुरू आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कलेक्टर असावा अशी सूचना बलवंतराव मेहता समितीनं केली होती. मात्र वसंतरावांनी इथं लोकप्रतिनिधी असावा हा आग्रह ठेवला. त्यांच्याच प्रयत्न आणि प्रेरणेतून सर्वसामान्य नागरिकाला हे प्रतिनिधीत्व मिळालं हे महत्त्वाचं.
ग्रामीण भागातून रोजगारासाठी खूप मोठा प्रवाह शहराकडे येत होता. त्यामुळेच वसंतरावांनी शहरांमधे रोजागाराच्या, व्यवसायांच्या संधी उपलब्ध करून दिल्यात. एम.आय.डी.ला त्यांनी अधिक गतिमान केलं. 18 मार्च 1970 रोजी सिडकोची स्थापना झाली.
सहकारी गृहनिर्माण चळवळीला गती मिळाली. नवी मुंबई, नवं औरंगाबाद विकसित झालं. त्यांच्या कारकीर्दीत वाषीच्या पुलाचं बांधकाम पाहालाच हजारो लोक यायचे. औरंगाबाद विमानतळाच्या बाबतीतही तसंच. साहित्य, कला आणि संस्कृतीतही वसंतरावांची विशेष अभिरूची होती.
सन 1962 साली चिनचं आक्रमण झालं. याच पार्श्वभूमीवर बाळ कोल्हटकरांनी ‘सीमेवरून परत जा’ हे नाटक बसवलं. त्यात पौरस आणि सिकंदर ही रूपकं वापरलीत. ते नाटक यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलं. त्यांनी वसंतराव आणि वत्सलाबाईंना ते नाटकं पाहावं असं सांगितलं. इंटरव्हलमधे वसंतराव कोल्हटकरांना भेटलेत.
त्यावेळी कोल्हटकर म्हणाले की, नाटकातील कमाईचा 30 टक्के हिस्सा हा शासनाला कर म्हणून द्यावा लागतो. मराठी नाटकांचं अस्तित्त्वच आता धोक्यात आलं आहे. तिथेच वसंतरावांनी एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी मराठी नाटकांना टॅक्स फ्री केलं. आचार्य अत्रे यांच्यासाठी अगदी चांदीच्या ताट-वाट्यांत वत्सलाबाईंनी जेवणाची व्यवस्था केली.
साहित्यीकांसोबतही वसंतरावांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. अरूंधती नाईक यांच्या ‘घुंगुरवाळा’ या काव्यसंग्रहावरच अत्रेंनी ‘मराठा’मधे अग्रलेख लिहिला होता. मराठी भाषेला 1960मधे राजभाषेचा दर्जा मिळाला. यातही वसंतरावांचं खूप मोठं योगदान आहे. झंझावातासारखे त्यांचं कार्य होतं. प्रसंग कोणताही असो, त्याला ते सामर्थ्यानं तोंड देत. 1965च्या पाकिस्तान युद्धाच्या काळात त्यांनी राज्यभर स्फूर्तिदायक भाषणं केलीत.
त्यांच्या कारकीर्दीत त्यांचा विरोधी पक्षदेखील तेवढाच ताकदवान होता. मात्र त्यावरही वसंतरावांचा एक वेगळाच प्रभाव होता. नानासाहेब गोरे आणि वसंतरावांची औरंगाबाद विमानतळावर भेट झाली. वसंतराव हे मुंबईला तर नानासाहेब हे पुसदला जात होते. आपल्या गावात नानासाहेब जात आहेत हे ऐकून त्यांना आनंद झाला.
त्यांनी लगेच सुधाकरराव नाईक यांना त्यांच्या व्यवस्थेची सूचना केली. त्यांच्या कार्यक्रमाला हजर राहण्यासही सांगितलं. सूचनेप्रमाणे सर्वच झालं. नानासाहेबांच्या समाजवादी पक्षाच्या कार्यक्रमात सुधाकरराव हे पहिल्या रांगेत बसले होते. मृणाल गोरे ह्या पुसदला जाऊन आल्याचं त्यांना नंतर कधीतरी कळलं.
‘‘ताई, तुम्ही तुमच्या भावाच्या घरी गेल्यात तरी या भावाला कळवलं नाही.’’ असं म्हणून त्यांनी माणुसकी जिंकली. राजकारण आणि माणूस हे दोन्ही विषय त्यांच्यालेखी स्वतंत्रच होते. त्यांनी आपल्या पदाचा किंवा सामर्थ्याचा नेहमी लोककल्याणासाठीच वापर केला. ते अजातशत्रू होते.
त्यांचे राजकीय किंवा वैचारिक विरोधक असतीलही; मात्र त्यांचा व्यक्तिगत विरोध कुणीच केला नाही. त्यांनी कुठल्याच क्षेत्रात किंवा कुणाषीच द्वेषबुद्धी ठेवली नाही. एवढंच काय तर विरोधात बातम्या लिहिणाऱ्या एका वर्तमानपत्रालाही त्यांनी जाहिराती दिल्यात.
त्यांच्या वागण्या-बोलण्यात, त्यांच्या राहणीमानातही एक वेगळा रुबाब होता. जॉर्ज फर्नांडिस यांनी एकदा कसल्यातरी मुद्यावरून संप पुकारला होता. त्यांची वसंतरावांसोबत रात्री 11ला बोलणी सुरू झाली. बाहेर मीडियाकर्मी प्रतीक्षा करत होते.
पहाटे 5.30च्या सुमारास ते दोघे बाहेर आलेत. पत्रकारांनी ‘‘काय झालं संपाच्या विषयाचं?’’ सवाल केला. जॉर्ज म्हणाले, ‘‘वसंतराव इतकावेळ मला शेती उत्पादन कसं वाढवता येईल’’ या विषयाचं महत्त्व पटवून देत होते. सर्व पत्रकार अवाक झालेत या घटनेनं.
मटका हा जुगाराच एक प्रकार. सामान्य कामगारवर्ग यात मोठ्या प्रमाणात यात नाडला जात होता. कितीही प्रयत्न करून यावर नियंत्रण आणणं यंत्रणेला कठीण जात होतं. यावर पर्याय म्हणून 12 एप्रिल 1969 रोजी वसंतरावांच्या कारकीर्दीत ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ला सुरू झाली.
माध्यमांनी यावर कडाडून टीकाही केली. मात्र एक रूपया तिकिटातून मिळालेल्या महसूलाचा त्यांनी विकासकामांसाठी उपयोग केला. सामान्यजनांना मटक्याच्या क्रूरचक्रातून काढण्याचा प्रयत्न केला. दारूबंदीसाठीदेखील त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
विनोबांच्या भूदान चळवळीतही त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी त्यांनी ‘जनता शिक्षण प्रसारक मंडळ’ स्थापन केलं. 1959 फुलसिंग नाईक महाविद्यालय त्यांनी सुरू केलं. 19 एप्रिल 1969 ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यालय त्यांनी सुरू केलं.
अनेक विदेश दौरे करून तिथलं तंत्रज्ञान, योजना त्यांनी इथल्या विकासकार्यासाठी वापरल्यात. एवढंच नव्हे तर तुरुंगातील कैद्यांचाही त्यांनी विचार केला. पैठण येथे 10 मे 1968 रोजी त्यांनी खुलं कारागृह सुरू केलं.
वसंतरावांची जयंती ही ‘कृषिदिन’ म्हणून साजरी केली जाते. 2015मधे त्यांच्यावर ‘महानायक वसंत तू’ हा चित्रपटदेखील निघाला. वसंतरावांना कृषि विद्यापिठांचे जनक, विकासाचे महानायक, जलयुक्त शिवार योजनेचे प्रेरणास्थान, ग्रामसडक योजनेची स्फूर्ती अशा अनेक अंगांनी बघता येईल.
विकासापासून दूर असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य त्यांनी अव्याहतपणे केलं. त्यांचा संघर्ष, त्यांचं कार्य त्यांनी त्यांची धडपड शेवटपर्यंत सुरूच होती. 18 ऑगस्ट 1979 रोजी सिंगापूर येथे त्यांची प्राणज्योज मालवली. त्यांनी केलेल्या अभूतपूर्व कार्यासाठी संपूर्ण देश त्यांचा ऋणी राहील. या महामानवास विनम्र अभिवादन…
सुनील इंदुवामन ठाकरे