बहुगुणी डेस्क, वणी: आपल्या जीवनात कोणतीही समस्या आली की तिच्या निराकरणासाठी आपल्यापेक्षा श्रेष्ठ शक्तीला शरण जाणे ही माणसाची स्वाभाविक अवस्था. अशा शरणागतांच्या उद्धारासाठी शास्त्रात विविध व्रते सांगितली आहेत.
गाणपत्य संप्रदायातील असेच एक अत्यंत दिव्य फलदायी व्रत म्हणजे श्रीसत्यविनायक व्रत. मात्र अनेकदा या व्रताचे फक्त नावच माहिती असते. करायचे कसे ते ज्ञात नसते. सांगणारे कोणी भेटतीलच याची शाश्वती नसते. सध्याच्या लाॅकडाऊन सारख्या विपरीत काळात तर गुरुजी देखील येऊ शकणार नाहीत.
अशा परिस्थितीत व्रत करायचे तरी कसे? या प्रश्नांवर सर्व समस्या दूर करणारे उत्तर म्हणजे विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड लिखित श्री सत्यविनायक पूजा विधि. पूजेला लागणारे साहित्य काय? पूजेची मांडणी कशी करावी? कोणत्या देवता, कोणते पदार्थ कोठे कसे ठेवावेत? या सर्व प्राथमिक तयारी पासून ग्रंथ आपली सोय करून देतो.
पूजा मांडणीशी संबंधित आकृत्या इतक्या सुस्पष्ट आणि सविस्तर वर्णनासह आहेत की एखाद्या शाळकरी मुलगा देखील या पुस्तकाच्या आधारे सहज पूजा करू शकेल. या ग्रंथाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथे आचमनापासून विसर्जनापर्यंत फक्त आणि फक्त श्री गणेश मंत्रांचाच विनियोग करण्यात आलेला आहे.
नेहमीच्या परिचित श्री केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः ऐवजी श्री गणेशाय नमः, श्री ढुंढिराजाय नमः, श्रीहेरंबाय नम: असे नामोच्चार पहिल्या क्षणापासूनच एक वेगळा आनंद देण्यास आरंभ करतात. जो अगदी पूजा संपेपर्यंत सतत वाढतच राहतो.
शंख,घंटा, कलश, नवग्रह इ. पूजन तर प्रत्येकच पूजेत असते. काही जागी अष्टदिक्पाल पूजन देखील आहे.
मात्र परिवार देवता पूजन स्वरूपात श्रीसत्यविनायकांच्या चार बाजूला लक्ष्मी नारायण, पार्वती शंकर, रती मदना सह श्रीजगदंबा आणि मही वराहां सह श्री सूर्य यांचे पूजन अभिनव वाटेल अशी रचना आहे.
भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी सांगितलेल्या पंचायतन पूजेची यात आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या महेश्वरांची पूजा केल्यानंतर भगवान सत्यविनायक यांचे प्रत्यक्ष पूजन प्रारंभ होते. यातील सगळ्या मंत्रांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रत्येक मंत्रात शेवटी आलेल्या ‘ श्रीसत्यविनायकाय ‘ या उल्लेखाच्या ऐवजी श्रीब्रह्मणस्पतये श्रीगणेशाय असा बदल केला की हे सर्व मंत्र आपल्याला रोजच्या पूजेत देखील परम शास्त्रीय पद्धतीने श्री गणेश पूजनाचा आनंद देऊ शकतात.
अशा स्वरूपातील सर्व व्रतांमध्ये आणखी महत्त्वाची असणारी एक गोष्ट म्हणजे त्याची कथा. या ग्रंथात सत्य विनायकाची मूळ संस्कृत कथा आणि नंतर त्याचा मराठी अनुवाद या दोन्ही गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
प्रस्तावनेमध्ये या कथांचे वेगळेपण मांडले आहेत ते विशेष अभ्यासनीय आहे. सर्वच देवतांच्या सत्य नावाने आरंभ होणाऱ्या कथा उपलब्ध आहेत. त्यापैकी सत्यनारायण, सत्याम्बा, सत्यदत्त विशेष प्रचलित आहेत. या सर्व व्रतां बद्दल पूर्ण आदर बाळगून लेखक सत्यविनायक व्रताचे महत्त्व सांगताना म्हणतात, अन्य कोणत्याही देवतेच्या कथेत, बाकी देवतांना या देवतेची उपासना करताना वर्णिलेले नाही.
मात्र सत्यविनायक कथा भगवान शंकर पार्वतीला सांगत आहेत.मी हे व्रत करतो असे ते म्हणतात. भगवान श्रीकृष्ण या व्रताने श्री गणेशांची उपासना करतात असे कथेतच वर्णन आहे. शेवटी विश्वाचा आरंभ करण्यासाठी ब्रह्मदेव, पृथ्वीला धारण करण्याच्या शक्ती साठी शेष इत्यादी स्वरूपात विविध देवतांनीच केलेले व्रताचरण वर्णन करून सत्यविनायकाचे वेगळेपण आणि भगवान गणेशांचे सर्वपूज्य सर्वादिपूज्य स्वरूप विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आले आहे.
सध्याच्या धकाधकीच्या काळात देखील कमीत कमी वेळात, कमीत कमी साधनसामुग्री सह आपल्या सकल मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान गणेशाची प्रार्थना करणारे हे व्रत अनेकांच्या दिव्य अनुभूतीचा विषय आहे.
आपले, आपल्याला हवे तेव्हा, कोणाच्याही सहाय्याशिवाय स्वत:च हे दिव्य व्रत आचरण करून मन इच्छित कामनापूर्ती आणि अपूर्व आनंद मिळविण्याची सुलभ पद्धती म्हणजे श्री सत्यविनायक पूजाविधी. जय गजानन