जब्बार चिनी, वणी: स्थानिक मित्रमंडळ, नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, जैताई मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार झाला. दहावी, बारावीत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रावीण्य मिळविणाऱ्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
येथील नगर वाचनालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक हरिहर भागवत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले.
अतिथींच्या हस्ते गुणानुक्रमे सर्वाधिक गुण प्राप्त करणारे दहाव्या वर्गातील रजिया मन्सूर शेख, स्मिता नानाजी ताजने, कनिष्का जीवने यांचा व बाराव्या वर्गातील सुवर्णा किसन हनुमंते, तेजल अतुल ताटीवार, धनश्री घोडके यांचा रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
त्यासोबत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या सुमित रामटेके यांचे वडील सुधाकर रामटेके, व अभिनव इंगोले यांचे वडील प्रवीण इंगोले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार मित्र मंडळ, नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, जैताई मंदिर व वनिता समाजातर्फे करण्यात आला.
प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे लक्ष ठरवून त्या प्रमाणे वाटचाल करून अंतिम लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनत करा असे आवाहन माधव सरपटवार यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. यासोबतच हरिहर भागवत, यूपीएससीमध्ये यशस्वी विद्यार्थी अभिनव इंगोले यांचे वडील प्रवीण इंगोले, रजिया शेख, तेजल ताटीवार यांनीही या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचालन मित्रमंडळाचे सचिव राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले. आभार विदर्भ साहित्य संघ वणी शाखेचे सचिव प्रा. अभिजित अणे यांनी मानलेत.