तालुका प्रतिनिधी, वणी: वणी ते कोरपना जाणाऱ्या मार्गादरम्यान कुरई ते ढाकोरी बोरी रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सदर मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सदर मार्गावर अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
वणी तालुक्यातील कुरई ते ढाकोरी बोरी हा सहा किलोमीटर अंतराचा मार्ग आहे. सदर मार्ग हा यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्याला जोडणारा आहे. शिंदोला ते कळमना मार्ग वाहतुकीयोग्य नसल्याने गडचांदूर, राजुरा परिसरातील वाहने ढाकोरी मार्गे येजा करतात. तसेच तेलंगणा राज्यात वाहतुकीसाठी या मार्गाचा वापर केला जातो.
खड्डयांचा अंदाज न आल्यामुळे छोटी मोठी दुचाकी, चारचाकी वाहन चिखलात फसत आहे. किरकोळ अपघात घडत आहेत. अशा प्रसंगी वाहन काढताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सोसावा लागतो. सदर मार्गाने प्रवास सुरु होताच नकळत वाहनचालक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींना शिव्या हासडायला सुरुवात करतात अशी जनमानसात चर्चा आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे होणारे दुर्लक्ष एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारे ठरू शकते. म्हणून बांधकाम विभागाने सदर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नितीन कौरासे यांनी केली आहे.