खासगी कंपनीत दारुची अवैधरित्या विक्री ?

परिसरात चोरीच्या घटना वाढल्या, अवैध धंद्यांना ऊत...

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील परिसरात दारुची राजरोसपणे अवैधरित्या विक्री असल्याचा आरोप होत असतानाच आता गावातील कंपनीत देशी दारूचा अवैधरित्या पुरवठा होत असल्याची माहिती आहे. त्यातच रविवारी एका संशयीत व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. मात्र त्याच्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने गावात चर्चेला एकच उधाण आले आहे.

मुकुटबन येथील कंपनीत मोठ्या प्रमाणात कामगार आहेत. त्याचा फायदा घेत काही तरुणांनी अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केल्याची माहिती आहे. कंपनीतील कामगारांना अवैधरित्या दारू पोहोचवली जाते. याबाबत पोलीस विभागाला कल्पना असूनही पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.

एक व्यक्ती ताब्यात पण नंतर सुटका….
6 सप्टेंबर रोज रात्री सिमेंट कंपनीच्या मुख्य गेट जवळ एका दारू पुरवठा करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात आले. परंतु त्या व्यक्तीवर कार्यवाही न करता त्याला सोडून दिल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. याप्रकरणी चिरीमिरी घेऊन हे प्रकरण रफादफा केल्याचा आरोप स्थानिक करीत आहे. दारू पुरवठा करणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही न करणारा कर्मचारी कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

मुकुटबन परिसरात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. चोरीच्या प्रमाणात आधीच वाढ झाली आहे. प्रकरणाचे तपास संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. परिणामी पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.